भारतीय वायुसेनेचे माजी ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी आता त्यांच्या करिअरची नवी इनिंग सुरु केली आहे. गोवा येथील एका खासगी कंपनीत अभिनंदन वर्धमान हे व्यावसायिक वैमानिक म्हणून कार्यरत झाले आहेत. २०१९ मध्ये पाकिस्तानचं फायटर जेट F 16 हे अभिनंदन वर्धमान यांनी पाडलं होतं. त्यांच्या पराक्रमानंतर त्यांना वीर चक्र देऊनही गौरवण्यात आलं होतं. आता ऑगस्ट महिन्यापासून अभिनंदन वर्धमान हे गोवा येथील खासगी विमान कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत आहेत. अभिनंदन वर्धमान यांची चर्चा २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणावर झाली होती.

२०२१ मध्ये अभिनंदन वर्धमान यांचा वीरचक्र देऊन गौरव

२०१९ च्या एअर स्ट्राईक दरम्यान अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडलं होतं. त्यानंतर त्यांना पाकिस्तानने ताब्यातही घेतलं होतं. पाकिस्तानकडे तीन दिवस त्यांचा ताबा होता. पण त्यानंतर मोदी सरकारने जी शिष्टाई केली तेव्हा त्यांना सोडण्यात आलं. अभिनंदन वर्धमान भारतात परतल्यावरही त्यांचं स्वागत झालं होतं. अभिनंदन वर्धमान यांना २०२१ मध्ये वीर चक्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. भारतात युद्ध काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या आणि पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांना ज्या सन्मानाने गौरवण्यात येतं त्यापैकी वीर चक्र हा क्रमांक तीनचा सर्वोच्च सन्मान आहे. The Pioneer ने हे वृत्त दिलं आहे.

FLY 91 कंपनीत अभिनंदन वर्धमान कार्यरत

FLY 91 या विमान कंपनीत अभिनंदन वर्धमान हे व्यावसायिक पायलट म्हणून रुजू झाले आहेत. दरम्यान या बाबत FLY 91 कंपनीच्या प्रवक्त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कर्मचाऱ्यांची माहिती आम्ही देत नाही कारण तो त्यांचा खासगी प्रश्न आहे असं प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अभिनंदन यांच्याबाबतचे इतर तपशील समोर आलेले नाहीत. FLY 91 ही कंपनी गोव्यात २०२४ मध्ये सुरु झाली आहे. या कंपनीकडे सहा एटीआर 72-600 विमानं आहेत. हैदराबादमध्येही ही कंपनी सेवा पुरवण्याचं काम करते. याच कंपनीत आता अभिनंदन वर्थमान हे व्यावसायिक वैमानिक म्हणून रुजू झाले आहेत.

अभिनंदन वर्धमान यांचं शिक्षण कुठून झालंय?

अभिनंदन वर्धमान यांचा जन्म २१ जून १९८३ ला चेन्नईमध्ये झाला. त्यांचं लहानपण आणि त्यानंतरचं शिक्षण विविध ठिकाणी असलेल्या वायुसेना स्टेशनांशी जोडलं गेलं होतं. त्यामुळेच त्यांना विमान या गोष्टी बाबत सुरुवातीपासूनच आकर्षण होतं. शिवाय त्यांचे वडील सिम्हाकुट्टी वर्धमान हे भारतीय वायुसेनेत एअर मार्शल पदापर्यंत पोहचले होते आणि मग निवृत्त झाले होते तर त्यांची व्यवसायाने डॉक्टर आहे. तमिळनाडूच्या अमरावतीनगर सैनिकी शाळेत अभिनंदन यांचं शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी खडकवासला या ठिकाणी असलेल्या NDA तूनही प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी भारतीय वायुसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.