नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वतंत्र पक्ष स्थापून भाजपशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर, प्रदेश काँग्रेस आणि राज्य सरकारने त्यांच्या विरोधातील संघर्ष तीव्र केला आहे. अमरिंदर यांच्या पाकिस्तानी पत्रकार मैत्रिणीचे पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’शी संबंध असल्याचा दावा करत पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर रंधावा यांनी, या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

पंजाब काँग्रेस आणि अमरिंदर सिंग यांच्यातील राजकीय मतभेदाचे वैयक्तिक टीका-टिप्पणीत रूपांतर झाले आहे. ‘आयएसआय’पासून देशाला धोका असल्याचे अमरिंदर सिंग यांचे म्हणणे होते. मग, या धोकादायक संस्थेशी संबंध असलेल्या महिला पत्रकार अरुसा आलम यांची सिंग यांच्याशी मैत्री असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. २००४ मध्ये पाकिस्तान दौऱ्यात अमरिंदर र सिंग यांची या महिला पत्रकाराशी भेट झाली, त्यानंतर अरुसा यांचे सिंग यांच्या घरी येणे-जाणे होते, मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यालाही त्या उपस्थित होत्या, असा मुद्दा उपस्थित करत, रंधावा यांनी पंजाब पोलिसांना तपास करण्याचा आदेश दिला जाईल असे सांगितले.

युतीचे भाजपचे संकेत

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली असून पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती करण्याचेही संकेत दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी शहा यांना शुभेच्छाही दिल्या. भाजपचे पंजाब प्रभारी दुष्यंत गौतम यांनी अमरिंदर सिंग यांच्या नव्या राजकीय वाटचालीचे स्वागत केले असून अमरिंदर सिंग हे देशभक्त आहेत व राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तींशी भाजपची युती करण्याची तयारी असल्याचेही दुष्यंत यांनी सांगितले.

‘बीएसएफ’वरूनही वाद

ड्रोनच्या मदतीने पाकिस्तानातून शस्त्रास्त्रे भारताच्या हद्दीत टाकली जातात, असे अमरिंदरसिंग गेली चार वर्षे सांगत आहेत. त्याच आधारावर त्यांनी पंजाबात सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) तैनात केले होते. हे सगळे मोठे कट-कारस्थान असल्याचा संशय बळावू लागला असल्याचा दावाही रंधावा यांनी केला. पंजाब, आसाम आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये ‘बीएसएफ’च्या कार्यकक्षेत केंद्र सरकारने वाढ केली असून त्याचे अमरिंदर सिंग यांनी स्वागत केले होते. ‘बीएसएफ’च्या विस्तारीकरणाला पंजाबमधील काँग्रेस सरकारने विरोध केला आहे. हा मुद्दादेखील पंजाब काँग्रेस आणि अमरिंदर सिंग यांच्यातील संघर्षाला कारणीभूत ठरू लागला आहे.