scorecardresearch

आजपासून मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य, उत्तर प्रदेश सरकारचा नवीन आदेश

आजपासून उत्तर प्रदेशातील मदरशांमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

national anthem mandatory in madrasas
(प्रातिनिधीक फोटो)

उत्तर प्रदेश सरकारने मदरशांबाबत एक नवीन आदेश जारी केला आहे. आजपासून राज्यातील मदरशांमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य करण्यात आलं आहे. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशाचे अल्पसंख्याक राज्यमंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी हा आदेश दिला आहे.

२४ मार्च रोजी उत्तर प्रदेशातील मदरशा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ९ मे रोजी याबाबतचा आदेश पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू होण्यापूर्वी गायल्या जाणाऱ्या धार्मिक प्रार्थनेबरोबरच राष्ट्रगीत (जन-गण-मन) देखील गायलं जाणार आहे.

खरंतर, मुस्लीम धर्माचा पवित्र सण रमझान निमित्त उत्तर प्रदेशातील मदरशांना ३० मार्च ते ११ मे या कालावधीत सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. गुरुवार १२ मेपासून मदरशा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पहिल्याच दिवसांपासून म्हणजेच आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा आदेश सर्व मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांना लागू असेल, असंही संबंधित आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

यापूर्वी २०१७ मध्ये उत्तर प्रदेश मदरशा बोर्डानं स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये राष्ट्रगीत आणि ध्वजारोहण अनिवार्य केलं होतं. या आदेशानंतर जवळपास पाच वर्षांनी राज्यातील सर्व मदरशांमध्ये दररोज शाळा सुरू होण्यापूर्वी धार्मिक प्रार्थनेसोबत राष्ट्रगीत (जन-गण-मन) म्हणणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: From today it is mandatory to sing national anthem in madrasas new order by uttar pradesh government rmm

ताज्या बातम्या