आपल्याला शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचं सेवन करणारे लोक माहीत असतील. मात्र, या दोन प्रकरांशिवाय एक तिसराही प्रकार आहे. तो म्हणजे विगन. विगन लोक दुग्धजन्य पदार्थ आणि अंडीचं सेवन करत नाहीत. विगन फूड हे पर्यावरणपूरक असल्याचं म्हटलंय जातं. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या वनस्पतींपासून मॉक मीट सारखे अनेक पर्यायी पदार्थ येत आहेत. हे सर्व सांगायचं कारण म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणने विगन खाद्यपदार्थांसाठी काही नवीन नियम आणले असून विगन पदार्थांसाठी एक नवा लोगो लाँच केला आहे.

ज्याप्रमाणे हिरव्या ठिपक्यात शाकाहारी पदार्थ आणि लाल ठिपक्यात मांसाहारी पदार्थ दर्शवण्यात येतात. त्याप्रमाणे विगन पदार्थ आता नवीन हिरव्या रंगाच्या लोगोने दाखवले जातील. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा भारत सरकारने विगन उत्पादनांना वेगळी ओळख दिली आहेत. याशिवाय काही नियम आणले असून विगन पदार्थ तयार करताना त्याचं पालन करणं आवश्यक असेल.

FSSAIमते, विगन खाद्यपदार्थामध्ये कोणत्याही प्राण्यांच्या घटकांचा वापर केला जात नाही. यात दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, मासे, चिकन, मांस, अंडी, मध किंवा रेशीम, रंग किंवा हाडांचा समावेश नसतो. हे पदार्थ पूर्णपणे वनस्पतींपासून बनवले जातात. करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून लोकांचा शाकाहारी आणि विगन पदार्थांकडे कल वाढला आहे. त्यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांप्रमाणेच विगन पदार्थांना महत्व देत त्यासाठी व्ही आकाराचा वेगळा लोगो आणि नियमावली आणली आहे.