देशातील खाद्य सुरक्षा नियामक संस्था ‘FSSAI’ने (भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने) पान मसाल्याच्या पॅकेजिंगबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. आता पान मसाला विक्रीसाठी प्लॅस्टिक, ॲल्युमिनियम फॉइल किंवा कोणत्याही प्रकारच्या सिंथेटिक कोटिंग असलेल्या रॅपर्सचा वापर करता येणार नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या FSSAI ने ‘खाद्य सुरक्षा आणि मानके (पॅकेजिंग) सुधारित नियम’ देशभरात तातडीने लागू केले आहेत.
पॅकेजिंगच्या नियमांत नेमका काय बदल?
FSSAI ने २०१८ च्या मूळ अन्न सुरक्षा नियमावलीतील ‘शेड्यूल ४’ मध्ये दुरुस्ती करून पान मसाल्याचा समावेश एका विशेष वर्गवारीत केला आहे. नव्या नियमांनुसार, पान मसाला पॅकिंगसाठी फक्त आणि फक्त खालील साहित्याचाच वापर करता येईल:
- पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त कागद किंवा पेपरबोर्ड
- सेल्युलोज किंवा इतर नैसर्गिक घटक
- काचेच्या अथवा पत्र्याच्या (टिन) बरण्या आणि डबे
जर कागदी पाकिटाच्या आतून प्लॅस्टिक, पॉलिस्टर, पीव्हीसी (PVC), सिंथेटिक पॉलिमर किंवा ॲल्युमिनियमचा अतिसूक्ष्म थर (कोटिंग) असेल, तर अशा पॅकिंगवरही आता कायद्याने पूर्ण बंदी असेल.
पर्यावरण रक्षण अन् अन्न सुरक्षा कडक!
पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत लागू असलेले ‘प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम, २०१६’ आता पान मसाला पॅकेजिंगलाही पूर्णपणे लागू करण्यात आले आहेत. FSSAI ने २८ एप्रिल रोजी या नियमांचा मसुदा जारी करून नागरिकांकडून ६० दिवसांत हरकती व सूचना मागवल्या होत्या. त्यावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रियांचा सखोल विचार करूनच हा अंतिम नियम राजपत्रात (Gazette) प्रकाशित करण्यात आला आहे.
पान मसाल्यावर बंदी आहे का?
FSSAI ने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय थेट पान मसाल्याच्या उत्पादन किंवा विक्रीवर बंदी घालणारा नाही, तर केवळ त्याच्या पॅकेजिंग साहित्यावर निर्बंध आणणारा आहे.
रस्त्यावर सहजासहजी फेकून दिल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या लहान पुड्यांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. हे प्रदूषण रोखणे आणि अन्न सुरक्षेचे निकष अधिक कठोर करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
भविष्यात पान मसाला महागणार?
नव्या पॅकेजिंग नियमांचा थेट फटका पान मसाला उत्पादक कंपन्यांच्या खिशाला बसणार आहे. कंपन्यांना आता जुनी पॅकिंग यंत्रणा बदलून कागदी किंवा टिन/काचेच्या पॅकेजिंगसाठी नव्या यंत्रसामग्रीत गुंतवणूक करावी लागेल.
काच, कागद आणि पत्र्याचे डबे यांसारख्या पर्यायी साहित्याचा निर्मिती खर्च प्लॅस्टिकच्या तुलनेत बराच जास्त असतो. त्यामुळे उत्पादन खर्चात होणारी ही वाढ कंपन्या थेट ग्राहकांवर वर्ग करण्याची शक्यता असून, येत्या काळात पान मसाल्याच्या किमती वाढू शकतात.
