scorecardresearch

श्रीलंकेत इंधन संकट भीषण; पेट्रोलपंपावर लागले ‘NO Petrol’चे बोर्ड, नागरिक हवालदिल

मागील काही काळापासून श्रीलंका विविध प्रकारच्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. प्रचंड महागाईसह देशात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

फोटो सौजन्य- एएनआय

मागील काही काळापासून श्रीलंका विविध प्रकारच्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. प्रचंड महागाईसह देशात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकच दिवस पुरेल इतका इंधनसाठा शिल्लक असल्याची माहिती काल श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी दिली आहे. यानंतर आज श्रीलंकेतील अनेक पेट्रोल पंपावर ‘नो पेट्रोल’च्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. पेट्रोल मिळेल या आशेनं नागरिकांनी अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या आहेत.

इंधन तुटवड्याचं भीषण वास्तव सांगणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी काल राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटलं की, ‘देशात केवळ एक दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा शिल्लक आहे. तेलाच्या तीन शिपमेंट आयात करण्यासाठी लागणारे डॉलर्सही सरकार जमा करू शकत नाही. तेलाची जहाजं पेमेंटसाठी कोलंबो बंदराबाहेर वाट पाहत आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

खरंतर, श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात विक्रमी स्तरावर महागाई वाढली आहे. दिवसातून तब्बल १८-१८ तास वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. अशात देशातील २२ दशलक्ष लोकांना अन्न, इंधन आणि औषधं पुरवण्यासाठीही सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. देशभरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपावर ‘नो पेट्रोल’चे बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही तासांत देशातील वाहनांची हालचाल ठप्प होणार आहे.

देशातील आर्थिक संकाटांचा सामना करण्यात सरकार अपयशी ठरल्यानंतर देशातील नागरिकांनी माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याविरोधात अनेक आठवडे आंदोलन केलं. जनतेचा रोष वाढत गेल्यानंतर अखेर राजपक्षे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गुरुवारी रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचा नवीन पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fuel stations in shri lanka put up no petrol posters amid severe shortage of petrol diesel rmm