नवी दिल्ली/ पुणे /छ. संभाजीनगर

पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असला तरी, भारतात पेट्रोल, डिझेल, एलपीजी किंवा नैसर्गिक वायूचा कोणताही तुटवडा नाही, अशी स्पष्ट हमी पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री हरदीप पुरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली. टंचाईच्या केवळ अफवा असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शहरांत गॅसटंचाईचे चटके बसतच असून सिलिंडर वितरणासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. दुसरीकडे, गॅसअभावी छोटी उपाहारगृहे, खाणावळी बंद पडू लागल्याने त्यावर अवलंबून असलेल्या विद्यार्थी आणि श्रमिकवर्गाने गावाकडची वाट धरली आहे.

देशातील एलपीजी गॅसपुरवठ्यातील अडचणी आणि संभाव्य तुटवड्याच्या मुद्द्यावर गुरुवारी संसदेत गदारोळ झाला. विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करत संसदेच्या आवारात आंदोलन केले आणि या विषयावर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. देशात एलपीजीचा साठा किती आहे, पुरवठा कधी सुरळीत होणार आणि सरकार कोणती पावले उचलत आहे याबाबत माहिती देण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यावर पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांनी लोकसभेत निवेदन दिले.

पश्चिम आशियातील संघर्षामुळे जगातील सुमारे प्रत्येकी २० टक्के कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी जहाज वाहतूक बाधित झाली आहे. मात्र, भारताने पर्यायी स्रोतांमधून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात केले असल्याने देशाच्या गरजांपेक्षा जास्त पुरवठा उपलब्ध आहे, असे पुरी यांनी लोकसभेतील निवेदनाद्वारे स्पष्ट केले. जागतिक बाजारात एलपीजीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्या तरी भारतात ग्राहकांवर त्याचा पूर्ण भार टाकलेला नाही. सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत अफवा वा चुकीची माहिती पसरवण्याऐवजी सर्वांनी संयम राखणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्र सरकारच्या ग्वाहीनंतरही गॅस आणि इंधनटंचाईची भीती कायम आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. हॉटेलांमधील गॅससाठा पुरवून वापरण्यासाठी काही खाद्यपदार्थांवर काट मारण्यात आली आहे. युद्ध सुरूच राहिल्यास गॅस सिलिंडर मिळणार नाही, या भीतीने वितरकांच्या दुकानांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत तर, पेट्रोल पंपांवरही आता वाहनांच्या रांगा वाढल्याचे चित्र आहे.

स्पर्धा परीक्षार्थींची बांधाबांध

व्यावसायिक सिलिंडर बंद झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक खानावळी बंद पडल्या आहेत. गुरुवारी रात्रीचे जेवण मिळणार नाही, असे काहींना कळवले आहे. तर काहींनी प्रतिमाह २०० रुपये भोजन शुल्क वाढविल्याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात राहणार्‍या मुलांनी गावाकडे जाण्यासाठी बांधाबांध सुरू केली आहे. करोना काळात ज्याप्रमाणे विद्यार्थी गावाकडेच थांबले होते, तशीच अवस्था आता झाल्याची भावना काही परीक्षार्थींनी व्यक्त केली.

लोखंडी सळ्यांच्या किमतीमध्ये वाढ

युद्ध सुरू झाल्यापासून म्हणजे २८ फेब्रुवारी ते आजपर्यंत लोखंडी सळ्यांच्या दरात प्रति क्विंटल सहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या १२ दिवसांत प्रतिटन ५६ हजार रुपये असणारा दर आता ६१ हजार ५०० रुपयांवर गेला आहे. आखाती देशासह विविध ठिकाणातून आयात होणारे स्क्रॅप पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे जालना येथील स्टील उद्योजक डी. बी. सोनी यांनी सांगितले.

केंद्राचे म्हणणे…

– सध्या भारत ४० देशांमधून कच्चे तेल आयात करतो. देशातील रिफायनर्‍या पूर्ण क्षमतेने उत्पादन करत आहेत.

– घरगुती पाइप गॅस आणि वाहनांसाठी ‘सीएनजी’चा १०० टक्के पुरवठा केला जात आहे. उद्योगांना सुमारे ८० टक्के आणि खत उद्योगाला ७० टक्के पुरवठा केला जाईल.

– अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अल्जीरिया आणि रशिया यांसारख्या देशांकडून एलपीजी खरेदी वाढवण्यात आली आहे. मागील पाच दिवसांत एलपीजी उत्पादनात २८ टक्के वाढ झाली आहे.