Fugitive Lalit Modi host Vijay Mallya birthday party in London shares video : इंडियन प्रीमियर लिग (IPL)चे माजी चेअरमन ललित मोदी याने विजय मल्ल्या याच्यासाठी एक आलिशान बर्थडे सेलीब्रेशन आयोजन केल्याचा प्रकार समोर आला आहे. ललित मोदीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ शेअर केल्यानंतर याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
पोस्टमध्ये ललित मोदीने त्याच्या घरात आयोजित केलेला हा कार्यक्रमाचे वर्णन हे ‘अमेझिंग सेलीब्रेशन’ असे केले आहे. या कार्यक्रमाला त्याचे कुटुंबिय आणि मित्र उपस्थित होते, जे त्याच्या मते जगाच्या वेगवेगळ्या भागांमधून आले होते. मल्ल्या याचा उल्लेख ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ असा करत, मोदी म्हणाला की माजी मद्यसम्राट ७० वर्षाचा झाल्याने हा क्षण एक महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच त्याने विजय मल्ल्या याला पुढील आयुष्यासाठी सुख आणि यश यासाठी शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी जिम रिडेल (Jim Rydell) यांनी ललित मोदी आणि मल्ल्या या दोघांचा एक फोटो एक्सवर शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी लंडन येथील त्याच्या घरी मल्ल्या याच्या ७० व्या वाढदीवसानिमीत्त एका शानदार प्री-बर्थडे पार्टीचे आयोजन केल्याबद्दल ललित मोदीचे आभार मानले होते.
या पार्टीला उपस्थित असलेल्यांच्या यादीमध्ये Biocon च्या संस्थापिका किरण मुजुमदार-शॉ, अभिनेता इद्रिस एल्बा आणि फॅशन डिझायनर मनोविराज खोसला यांचा समावेश होता. या पार्टीतील फोटोनुसार किरण मुजुमदार-शॉ एका फोटोमध्ये खोसला यांच्याबरोबर पोज देताना, तर दुसऱ्या फोटोमध्ये इद्रिस एल्बा यांच्याशी गप्पा मारताना दिसून आल्या.
“लंडन येथील त्यांच्या घरी काल रात्री विजय मल्ल्या याच्या सन्मानार्थ एका शानदार ७० व्या वाढदिवसानिमीत्त प्री-बर्थडे पार्टीचे आयोजन केल्याबद्दल ललित के मोदी यांचे आभार,” असे रिडेल यांनी लिहिले आहे.
या पोस्टला ललित मोदीने उपस्थितांचे आभार देखील मानले आहेत. “माझा घरी आयोजित केलेल्या माझा मित्र विजय मल्ल्याच्या प्री-बर्थडे पार्टीच्या सेलिब्रेशनसाठी आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार,” असे तो म्हणाला आहे.
या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. लोक ललित मोदी आणि विजय मल्ल्या या दोघांनाही चांगलेच ट्रोल करत आहेत. अनेक वर्षांपासून भारतातून फरार झालेले हे लोक परदेशात अशा पार्ट्या करत असल्यावरून लोक त्यांच्यावर टीका करत आहेत.
किंगफिशर एअरलाइन्स कोसळल्यामुळे ओढावलेल्या कायदेशीर अडचणींच्या दरम्यान विजय मल्ल्या हा मार्च २०१६ मध्ये भारत सोडून पळून गेला. ९ हजार कोटींहून अधिकच्या बँकेचे कर्जाच्या संबंधित फसवणूक आणि मनीलाँड्रिंग अशा आरोपांखाली भारतातील यंत्रणांना मल्ल्या हवा आहे. तेव्हापासून मल्ल्या हा यूकेमध्ये राहत आहे.
आयपीएल (IPL) सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा ललित मोदीने २०१० मध्ये भारतातून पळ काढला. आर्थिक गैरव्यवहार, लिलावात अफरातफर आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांनंतर त्याला आयपीएल अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते, त्यानंतर तो देश सोडून पळाला.
