Nehal Modi Arrested: हिरे व्यावसायिक नीरव मोदीचा लहान भाऊ निहल मोदीला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने सादर केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून ही अटक करण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ४६ वर्षीय नेहल मोदीला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले.

नेहल मोदीला अटक केल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना दिली आहे. १७ जुलै रोजी नेहल मोदीला न्यायालयात सादर केले जाईल, तिथे त्याच्याकडून जामीनासाठी अर्ज केला जाऊ शकतो. मात्र अमेरिकेतील सरकारी वकिल या जामिनाला विरोध करतील, असेही पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

भारताकडून दोन प्रकरणात प्रत्यार्पणाची मागणी केली गेली आहे. पीएमएले कायद्याच्या कलम ३ नुसार एक मनी लाँडरींगचे प्रकरण आहे. तर भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-ब आणि २०१ अंतर्गत गुन्हेगारी कट रचणे आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याचाही आरोप नेहल मोदीवर आहे.

भारतीय बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा

नेहल मोदीची अटक पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या १३,००० कोटींच्या घोटाळ्यासंबंधी आहे. भारताच्या बँकिंग इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा होता. या घोटाळ्यात नीरव मोदी, नेहल मोदी आणि त्यांचे मामा मेहूल चोक्सी यांचा हात होता.

बेल्जियममधील अँटवर्प येथे जन्मलेल्या आणि तिथेच वाढलेल्या नेहल मोदीला इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदीच्या वतीने घोटाळ्यातून मिळालेल्या पैक्षांची लाँडरिंग केल्याबद्दल तो भारताला हवा आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधील कारागृहात असून भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहलला अटक कशी झाली?

२०१९ साली इंटरपोलने नेहलविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस दिली. त्यानंतर जागतिक पातळीवर त्याचा शोध सुरू झाला. २०२१ मध्ये, तो अमेरिकेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीबीआय आणि ईडीने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. भारताच्या विनंतीवरून आता त्याला अटक करण्यात आली आहे.