Indigo flight emergency landing at Delhi airport engine failure: दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी विशाखापट्टणमहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो विमानाचे इंदिरा गांधी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. यानंतर विमानतळावर काही काळ आणीबाणी घोषित करण्यात आली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोच्या 6E 579 या विमानात एकूण १६१ प्रवासी होते. विमानाचे एक इंजिन निकामी झाल्याचे कळल्यानंतर सकाळी १०:३९ वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे आपत्कालीन लँडिंग केल्यामुळे अनर्थ टळला.

फ्लाइट ट्रॅकिंग संकेतस्थळ फ्लाइट रडार २४ ने दिलेल्या माहितीनुसार, बोईंग ७३७ हे विमान सकाळी सुमारे १०:५९ वाजता दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी इंडिगोच्या विमानाने विशाखापट्टणमहून दिल्लीच्या दिशेने झेपावले. दिल्ली विमानतळापासून जवळच असताना वैमानिकाने इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती दिली. या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी २८ क्रमांकाची धावपट्टी तात्काळ खुली करण्यात आली. तसेच अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आरोग्य पथक तात्काळ तैनात करण्यात आले. संपूर्ण धावपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला.

सर्व प्रवासी, क्रू सदस्य सुखरूप

काही वेळातच इंडिगोच्या विमानाचे २८ क्रमांकाच्या धावपट्टीवर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. वैमानिकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांना सुखरूप विमानाच्या बाहेर काढण्यात आले.

दिल्ली अग्निशमन सेवेने दिलेल्या एका निवेदनात म्हटले की, दिल्ली विमानतळावर आज सकाळी एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. अग्निशमन दलाला सकाळी १०:५३ मिनिटांनी आपत्कालीन लँडिंगची माहिती मिळाली होती.

तर इंडिगोनेही यासंबंधी निवेदन दिले असून त्यांनी म्हटले, लँडिंगला काही वेळाआधी वैमानिकाला तांत्रिक अडचण आढळून आली. त्यानंतर वैमानिकांनी मानक कार्यपद्धतीचा अवलंब करत प्राधान्याने लँडिंगची विनंती विमानतळाला केली. यानंतर विमान सुखरूप उतरविण्यात आले. विमानाची आवश्यक तपासणी आणि देखभाल सुरू आहे. प्रवासी आणि कर्मचारी यांची सुरक्षा यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.