यूकेमधील नवीन प्रवासाच्या नियमांनुसार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयाचं लसीकरण युकेमध्ये ग्राह्य धरले जाणार नाही आणि त्यांना १० दिवस अलगीकरणात राहावं लागणार आहे. नवीन नियमांवर प्रतिक्रिया देताना, काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, “कोविशील्ड लस मुळात यूकेमध्ये विकसित करण्यात आली होती. तसेच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने त्यांना देखील लसीचा पुरवठा केला आहे. त्यानंतरही नवीन नियम काढणं हे विचित्र असून हे वर्णद्वेषाचे धक्के आहेत.”

यूके सरकारने म्हटलंय की जर एखाद्या व्यक्तीचं आफ्रिका, दक्षिण अमेरिका, यूएई, भारत, तुर्की, जॉर्डन, थायलंड आणि रशिया या देशांमध्ये लसीकरण केले गेले असेल तर त्यांचं लसीकरण झालेलं नाही, असं मानलं जाईल आणि त्यांना अलगीकरणाचे नियम पाळावे लागतील.

भारतीयांसाठी नियम – भारतात पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांसाठी:

इंग्लंडला जाण्यापूर्वी काय करायचं:

-इंग्लंडला जाण्याच्या ३ दिवसापूर्वी करोना चाचणी करावी लागणार. 

-इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि ८ दिवसांनी घेतल्या जाणाऱ्या करोना चाचण्या बुक करा आणि त्याचे पैसे भरा. 

-तुम्ही इंग्लंडमध्ये जाण्यापूर्वी ४८ तासांमध्ये तुमचे प्रवासी लोकेटर फॉर्म पूर्ण करा.

तुम्ही इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर काय करायचं..

-घरात किंवा जिथे तुम्ही राहणार असाल तिथे १० दिवस क्वारंटाईन व्हा.

-पोहोचल्यानंतर २ आणि ८ दिवसांनी करोना चाचणी करा.

यूके सरकारने पूर्णपणे लसीकरण धरलेल्या व्यक्तींना हे करण्याची गरज नाही.

यूकेच्या प्रवासी नियमांमध्ये देशांना तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले आहे. हिरवा, पिवळा आणि लाल. भारत पिवळ्या रंगाच्या श्रेणी मध्ये आहे. 

यूके सरकारच्या वेबसाइटने म्हटले आहे की, “सोमवार ४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ४ वाजल्यापासून, इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियम लाल, पिवळा, हिरवा या ट्रॅफिक लाईट सिस्टीममधून बदलून एकाच लाल रंगाच्या यादीत टाकण्यात येत आहे. लाल रंगाच्या यादीत नसलेल्या देश आणि प्रदेशांमधून प्रवासाचे नियम तुमच्या लसीकरणाच्या स्थितीवर अवलंबून असतील.”