तामिळनाडूमधील कुन्नरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले भारताचे संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कृतिका आणि तारिणी या त्यांच्या मुलींनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी जनरल रावत यांच्या नातवांनीही अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली. त्यांना १७ 'गन फायर'ची सलामी देण्यात आली. यावेळी देशातील दिग्गज राजकीय नेत्यांसह भारतीय संरक्षण दलातील ८०० वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय नेपाळ, भुतान, बांगलादेश, श्रीलंकाचे सैन्य दल प्रमुखांनी उपस्थिती लावली. जनरल रावत आणि त्यांची पत्नी यांचे पार्थिव शुक्रवारी (१० डिसेंबर) सकाळी ११ वाजता त्यांच्या दिल्ली येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यानंतर त्यांचे नातेवाईक, मित्र, इतर सर्वांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजीत डोभाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांना आदरांजली वाहिली. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे, हरीश रावत, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि डीएमकेचे नेते ए. राजा आणि कनिमोई हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. नेमकं घडलं काय? मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ प्रवासी होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाच्या सहकार्याने तातडीने बचावकार्य हाती घेतलं होतं. हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होतं? दरम्यान, बचावकार्य संपल्यानंतर जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये सीडीएस बिपिन रावत यांचा देखील समावेश होता. आधी हेलिकॉप्टरमधील एकूण १४ प्रवाशांपैकी ११ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर १४ पैकी १३ प्रवाशांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. त्यामध्ये जनरल बिपिन रावत यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी साई तेजा आणि हवालदार सतपाल हे प्रवास करत होते.