अ.भा. आखाडा परिषदेचे दिवंगत अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवावर बुधवारी अलाहाबादेतील बाघंबरी मठात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी ते या मठात त्यांच्या शिष्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते.

यापूर्वी, पाच डॉक्टरांच्या एका चमूने गिरी यांची उत्तरीय तपासणी केल्यानंतर, गंगा, यमुना व पौराणिक सरस्वती या नद्यांच्या संगमावर पार्थिवाला स्नान घालण्यात आले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास एका लिंबाच्या झाडाखाली महंतांना ‘भू समाधी’ देण्यात आली.

सुमारे अडीच तासांच्या शवचिकित्सेनंतर अहवाल एका बंद लिफाफ्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. शवचिकित्सेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी १८ सदस्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते, तसेच त्यांच्या एका शिष्याला हरिद्वार येथून ताब्यात घेतले होते. या मृत्यूशी संबंधित सर्व पैलूंचा तपास करण्यात येत असून दोषींची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते.

‘राज्य सरकारकडून सत्य लपवण्याचा प्रयत्न’

नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी मेरठमध्ये केली. राज्य सरकार या साधूच्या अनुयायांची दिशाभूल करत असून, सत्य लपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. उत्तरीय तपासणी करण्यापूर्वीच ही आत्महत्या होती की खून याबाबतचा निष्कर्ष पोलिसांनी कसा काढला, असा प्रश्न त्यांनी विचारला.