चीनमधील धार्मिक बाबींवरील शासकीय निर्बंध आणखी कठोर करण्यात यावेत, असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी फर्मावले आहे. सर्वच धर्मांचे अनुपालन हे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणांना अनुरूप असेल, अशी दक्षता घेण्याचे त्यांनी बजावले आहे.

चीनमध्ये २०१९ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या एका अधिकृत श्वेतपत्रिकेनुसार, देशात सुमारे २० कोटी नागरिके हे धार्मिक श्रद्धा बाळगणारे आहेत. त्यामधील बहुसंख्य हे तिबेटमधील बौद्धधर्मीय आहेत.

अन्य धार्मिक श्रद्धावंतांमध्ये दोन कोटी मुस्लीम, ३ कोटी ८० लाख प्रोटेस्टंट ख्रिस्ती आणि ६० लाख कॅथलिकांचा समावेश आहे. चीनमध्ये सुमारे एक लाख ४० हजार धार्मिक स्थळे आहेत. ६८ वर्षीय क्षी हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख तसेच शक्तिशाली लष्करशहा अध्यक्ष आहेत. ते संपूर्ण हयातभर सत्तेत राहण्याची शक्यता आहे. देशातील नागरिकांचे धार्मिक आचरण हे सरकारी धोरणांशी सुसंगत राहील यावर त्यांनी भर दिला असून त्यासाठी असे धार्मिक वृत्तीचे नागरिक हे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनानुसार वागावेत, यासाठी त्यांची वैचारिक फेरघडण करण्यास सांगितले आहे.

बीजिंगमध्ये नुकतीच धार्मिक बाबींवरील धोरणविषयक राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेत जिनपिंग यांनी आपले धोरण स्पष्ट केले.

देशात धार्मिक नेत्यांवर लोकशाही मार्गाने होणाऱ्या पर्यवेक्षणात सुधारणा होण्याची गरज आहे. धार्मिक बाबींमध्येही कायद्याचे राज्य हे तत्त्व ठासविण्याची ही वेळ आहे. कायदा सर्वांसाठी समान आणि अनिवार्य असतो याबाबत सर्वदूर प्रसिद्धी आणि जागृती करण्याची आवश्यकता आहे.

-क्षी जिनपिंग, चीनचे अध्यक्ष