scorecardresearch

‘जी-२०’च्या सोहळय़ात देशवासींना सहभागी करून घ्या!

‘जी-२०’ देशांच्या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून सर्व देशवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

‘जी-२०’च्या सोहळय़ात देशवासींना सहभागी करून घ्या!
नरेंद्र मोदी

भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : ‘जी-२०’ देशांच्या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून सर्व देशवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. भारतीय संस्कृती अवघ्या जगाला दाखवून देण्याची हीच वेळ आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्या. ‘जी-२०’च्या अध्यक्षपदाच्या सोहळय़ात देशवासीयांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न करा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात दिला.

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदानाचा दुसरा टप्पा पार पडत असताना, भाजपने दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. २०२४ मधील लोकसभा निवडणूक तसेच, २०२३ मधील विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी ही बैठक आयोजित केली आहे. दोन दिवसांच्या चिंतन बैठकीनंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रीय महासचिवांशीही स्वतंत्रपणे चर्चा करू शकतात, असे समजते. भाजपचे राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय सचिव, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, राज्य प्रभारींनी आपापल्या राज्यांतील संघटनात्मक बांधणीचा अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना सादर केला.

‘मिशन १४४’वर सखोल चर्चा..

भाजपने ‘मिशन १४४’चा यापूर्वीही आढावा घेतला होता. मात्र या बैठकीत केंद्रीय मंत्रीही विविध लोकसभा मतदारसंघांबाबत भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा अहवाल मांडणार आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले असून केंद्रीय मंत्र्यांकडे या मतदारसंघांची जबाबदारी दिली होती. या बैठकीमध्ये ‘मिशन १४४’वर सखोल चर्चा केली जाणार असल्याचे समजते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या