जोहान्सबर्ग : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) सुधारणा करणे हा केवळ पर्याय उरला नसून ती आता एक गरज झाली आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यान भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांच्या (आयबीएसए) नेत्यांची परिषद झाली. त्या वेळी जागतिक संघटनांमध्ये बदलावर चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्राझीलचे अध्यक्ष लुइस इनासिओ लुला डिसिल्वा आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा या बैठकीत सहभागी झाले. या वेळी मोदी म्हणाले की, जगाची विभागणी झाल्याचे चित्र असताना ‘आयबीएसए’ ऐक्य, सहकार्य आणि मानवतेचा संदेश देऊ शकतो. तिन्ही देशांदरम्यान सुरक्षाविषयक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी ‘आयबीएसए’च्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या स्तरावर बैठका सुरू करण्याचा प्रस्तावही मोदी यांनी मांडला.
मानवकेंद्रित विकासासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. तिन्ही देशांदरम्यान ‘यूपीआय’सारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, ‘कोविन’सारखे आरोग्य मंच उभारण्यासाठी, सायबर सुरक्षा चौकटी आणि महिलांच्या नेतृत्वात तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम सामायिक करण्यासाठी ‘आयबीएसए डिजिटल इनोव्हेशन अलायन्स’ स्थापित करण्याचा प्रस्तावही मोदी यांनी मांडला.
दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये आपण सहकार्याने पुढे गेले पाहिजे. अशा गंभीर मुद्द्यावर कोणत्याही दुटप्पीपणाला जागा नाही. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
‘एआय’चा गैरवापर रोखण्यासाठी जागतिक धोरणाचे आवाहन
जी-२० शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रामध्ये कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) विषयावर चर्चा झाली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘एआय’च्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त करत तो रोखण्यासाठी जागतिक धोरण आखण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच अशा महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांचा वापर हा वित्त-केंद्रित न ठेवता मानव-केंद्रित व्हायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.
आणखी एका वादाची ठिणगी?
जी-२० शिखर परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष किंवा वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहता काही कनिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या देशाचे प्रतिनिधित्व केले. पुढील शिखर परिषद अमेरिकेत होत असून प्रथेप्रमाणे जी-२०चे अध्यक्षपद यजमान दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेकडे सोपवणे अपेक्षित होते. मात्र, आपण कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे यजमानपद सोपवणार नाही, अशी भूमिका यजमान देशाने घेतल्यामुळे त्यावरून आणखी एक राजनैतिक वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
