फ्लोरिडा विद्यापीठाचे संशोधन
वैज्ञानिकांनी नासातील दुर्बिणींच्या मदतीने मोठा दीर्घिकासमूह शोधून काढला असून तो ८.५ अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे. एवढय़ा लांब अंतरावर इतक्या जास्त वस्तुमानाचा असा समूह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. दीर्घिकासमूह हे हजारो दीर्घिका गुरुत्वीय बलाने बांधल्या गेल्याने तयार होत असतात. त्यात अब्जावधी तारे असतात व दीर्घिका समूह कालांतराने मोठे होत जातात व कारण त्यात आणखी दीर्घिकांची भर पडत जाते. बऱ्याच काळात तयार झालेले हे दीर्घिकासमूह अब्जावधी वर्षांपूर्वी होते तसे दिसत आहेत. आपले विश्व तरुण असतानाचा तो काळ होता. प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागत असल्याने या दीर्घिकासमूहांकडून फार वर्षांपूर्वी निघालेला प्रकाश आता आपल्याला दिसतो. म्हणजे तेव्हाची स्थिती आता आपल्याला दिसत आहे. नवीन दीर्घिकासमूह मासिव्ह ओव्हरडेन्स ऑब्जेक्ट जे ११४२ प्लस १५२७ या नावाने ओळखला जातो व तो ८.५ अब्ज वर्षांपूर्वीचा आहे म्हणजे पृथ्वीच्या जन्माच्या खूप आधीचा आहे. दूरस्थ दीर्घिकांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत असतो व येताना त्याची तरंगलांबी अवरक्त किरणांसारखी वाढते.
नासाच्या स्पिटझर व वाइड फिल्ड इन्फ्रारेड सव्‍‌र्हे एक्सप्लोरर (वाइज) या दुर्बिणींनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. वैज्ञानिकांनी प्रथम वाइजच्या नोंदणीतील दीर्घिकांची छाननी केली. वाइजच्या नोंदणीत २०१० ते २०११ या काळात घेतलेल्या प्रतिमांच्या स्वरूपात लाखो अवकाशीय पदार्थाची नोंद आहे. नंतर त्यांनी स्पिटझर दुर्बिणीच्या माध्यमातून २०० पदार्थावर लक्ष केंद्रित केले. त्या प्रकल्पाचे नाव ‘मॅसिव्ह अँड डिस्टंट क्लस्टर्स ऑफ वाइज सव्‍‌र्हे’ असे होते. स्पिटझर व वाइज यांच्या संयुक्त वापराने अवकाशातील अनेक दीर्घिकासमूह शोधण्यात आले, असे फ्लोरिडा विद्यापीठाचे अँथनी गोन्झालेझ यांनी सांगितले. हवाई बेटांवरील मौना किया येथील डब्लूएम केक व जेमिनी वेधशाळेने या दीर्घिकासमूहाचे अंतर ८.५ अब्ज प्रकाशवर्षे असल्याचे सांगितले. नासाच्या जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेचे पीटर इसेनहार्ट यांनी सांगितले, की आमच्या मते या संशोधनातून विश्वाच्या निर्मितीपासून दीर्घिकासमूह कसे तयार होत गेले हे समजले आहे. आताचा दीíघकासमूह हा त्या काळातील पाच मोठय़ा समूहांपैकी एक आहे. येत्या वर्षांत १७०० दीर्घिकासमूहांचे अभ्यास स्पिटझर दुर्बिणीच्या मदतीने करणार आहे. या मोठय़ा दीर्घिकासमूहातून इतरही बरीच माहिती मिळणार आहे. ‘अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.