New Delhi AI Summit Chinese Robodog Controversy: चिनी रोबोडॉगला स्वतःचा म्हणून सादर केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या, नोएडा येथील गलगोटिया विद्यापीठाला इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमधून स्टॉल सोडण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे. स्टॉल सोडण्याचे आदेश दिल्यानंतर स्टॉलचा वीज पुरवठा बंद केल्याची माहिती समोर आली आहे. गलगोटिया विद्यापीठाने रोबोडॉग हा इन-हाऊस इनोव्हेशन म्हणून प्रदर्शित केले होते. पण, हा रोबोडॉग चिनी उत्पादन असल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावरुन विद्यापीठावर जोरदार टीका झाली.

स्टॉल सोडण्याचे आदेश

गलगोटिया विद्यापीठाने मात्र रोबोडॉग निर्मिती केली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. शिवाय स्टॉल सोडण्याचा कुठलाही आदेश प्राप्त झाला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, विद्यापीठाने नवी दिल्ली येथील भारत मंडपमधील स्टॉलची आवराआवर करण्यास सुरुवात केल्याचे रॉयटर्सने वृत्तात म्हटले आहे.

विद्यापीठाने रोबोडॉग प्रदर्शित केल्यानंतर सोशल मीडियावरुन जोरदार ट्रोलिंग करण्यात आले. सरकारकडून देखील प्रकरणावरुन नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

वादानंतर विद्यापीठाने स्पष्टीकरण काय दिले?

सोशल मीडियातून टीका झाल्यानंतर विद्यापीठाने रोबोडॉगची त्यांनी निर्मिती केली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, हा रोबोडॉग विद्यार्थ्यांच्या शिकवणीसाठी वापरला जात असल्याचे सांगितले. “आमचे विद्यार्थी रोबोडॉगसोबत प्रयोग करत आहेत. त्याच्या क्षमता, कार्यपद्धती यांचा अभ्यास करत आहेत. गलगोटियाने या रोबोडॉगची निर्मिती केली नाही आणि आम्ही कधीच तसा दावाही केला नाही”, असे विद्यापीठाने एक्सवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

नक्की वाद काय?

दिल्लीतील एआय समिटमध्ये गलगोटिया विद्यापीठाने ओरियन रोबोडॉग प्रदर्शित केला आहे. विद्यापीठाने ३५० कोटी एआय कार्यक्रमाअंतर्गत त्याची निर्मिती केल्याचे विद्यापीठाच्या प्राध्यापिका नेहा सिंग एका व्हिडिओत सांगत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केला होता. दरम्यान, हा रोबोडॉग चायनीज असल्याचे समोर आले. यानंतर विद्यापीठावर सोशल मीडियातून जोरदार टीका झाली. विरोधकांकडून देखील सरकारवर सडकून टीका केली.

चिनी सोशल मीडियातही व्हायरल

दिल्लीतील हा प्रकार चिनी सोशल मीडियात देखील व्हायरल झाल्याचे दिसून आले. गलगोटिया विद्यापीठाने चिनी रोबोडॉग एआय समिटमध्ये प्रदर्शित केल्याचा व्हिडिओ चायना प्लसवरुन पोस्ट करण्यात आला.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमणावर ट्रोलिंग झाल्यानंतर सरकारने देखील या घटनेची गंभीर दखल घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, स्टॉल सोडण्याचे आदेश दिल्यानंतर स्टॉलचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. तसेच, स्टॉलवरील उपस्थितांनी आवराआवर सुरु केल्याचे दिसून आले.