Galgotias University Robodog: दिल्लीत होत असलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ची चर्चा सध्या जोरात होत आहे. पहिल्या दिवशी गर्दीवर नियंत्रण न राहिल्यामुळे आणि बंगळुरूमधील कंपनीचे गॅझेट्स चोरी झाल्यामुळे चर्चेत राहिलेल्या एआय एक्स्पोमधील आता नवीन वाद समोर आला आहे. या एआय समिटमध्ये जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक कंपन्या सहभागी झालेल्या आहेत. दिल्लीतील गलगोटिया विद्यापीठाचाही एक स्टॉल लावण्यात आला आहे. गलगोटिया विद्यापीठाने पहिल्या दिवशी एक रोबोटिक डॉग प्रदर्शनात दाखवला होता. यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गलगोटिया विद्यापीठाला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर आता गलगोटिया विद्यापीठाने उत्तर दिले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये गलगोटिया विद्यापीठाने काय म्हटले?

डीडी न्यूजने एआय इम्पॅक्ट समिटमधील कंपन्यांशी संवाद साधला होता. यावेळी गलगोटिया विद्यापीठाच्या स्टॉलवर उपस्थित असलेल्या महिलेने रोबोटिक डॉगबद्दल माहिती दिली. याचे नाव ओरायन असून याची निर्मिती गलगोटिया विद्यापीठाने केली असल्याचे या महिलेने सांगितले होते. हा व्हिडीओ व्हायरल होताच सुजाण नेटिझन्सनी हो रोबोडॉग मूळ कोणत्या कंपनीचा आहे, हे शोधून काढले. यानंतर गलगोटिया विद्यापीठाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर गलगोटिया विद्यापीठानं आपली बाजू मांडली आहे. विद्यापीठाने सांगितले की, हा रोबोडॉग आम्ही तयार केलेला नाही. तो फक्त विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आणण्यात आला होता. तसेच एक्सवर एक अधिकृत निवेदन शेअर करत विद्यापीठाने आपली बाजू मांडली आहे.

गलगोटिया विद्यापीठाने म्हटले, “आम्ही विदेशातून तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला आहे. कारण विद्यार्थी जेव्हा नव्या गोष्टी पाहतात, तेव्हाच त्यांची सर्जनशीलता विकसित होते आणि हाच विचार नव्या कल्पनांना जन्म देतो. चीनच्या युनिट्री कंपनीकडून आणलेला रोबोटिक डॉग याच प्रयत्नाचा एक भाग आहे. हा रोबोडॉग फक्त दाखविण्यासाठी आणलेला नाही तर तो एक चालता-फिरता वर्ग आहे. आमचे विद्यार्थी यावर प्रयोग करत आहेत. याच्या क्षमता तपासत आहेत. यातून आम्ही आमचे ज्ञान वाढवत आहोत.”

आम्ही रोबोडॉग तयार केलेला नाही

विद्यापीठाने पुढे स्पष्ट केले की, आम्ही हा रोबोडॉग तायर केलेला नाही किंवा आम्ही तसा दावाही केलेला नाही. पण आम्ही असे नवे तंत्रज्ञान विकसित करणारे मेंदू घडविण्याचे काम करत आहोत. लवकरच भारतातही असे तंत्रज्ञान विकसित होईल. आम्ही अशा उपकरणांची निर्मिती इथेच करू. कल्पकतेची कोणतीही सीमा नसते. तसेच शिक्षणाचीही नसते. आम्ही जगभरातील चांगले तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करत राहू. कारण आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करता येईल.

रोबोडॉग कुणी विकसित केला?

युनिट्री Go2 या चीनच्या रोबोटिक्स कंपनीद्वारे हा एआय आधारित रोबोटिक डॉग तयार करण्यात आला आहे. ॲडव्हान्स सेन्सर्स आणि चपळतेबाबत हा रोबोडॉग जगभरात लोकप्रिय झालेला आहे. यात 4D LiDAR तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हे उपकरण शिड्या चढणे, ओबड-धोबड रस्त्यांवर पळणे यासारखी कृत्ये आरामात करू शकतो.