नवी दिल्ली : जगभरात गाजावाजा होत असलेल्या ‘एआय इम्पॅक्ट समिट’च्या अधिकृत उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला, बुधवारी चिनी बनावटीच्या ‘रोबोटिक डॉग’ला स्वत:चे नावीन्यपूर्ण प्रदर्शन असल्याचा नोएडातील गलगोटियास विद्यापीठाचा दावा उघड झाल्याने भारताच्या ‘एआय’ क्षेत्रातील नवोन्मेषाच्या (इनोव्हेशन) विश्वासार्हतेला जबरदस्त धक्का बसला.
दिल्लीतील ‘भारतमंडपम’मध्ये भरलेल्या ‘एआय एक्स्पो’मध्ये नोएडामधील गलगोटियास विद्यापीठाने प्रदर्शित केलेला एआयधारित ‘रोबोटिक डॉग’ चिनी बनावटीचा असल्याचे वास्तव समाजमाध्यमकर्त्यांनी उघड केल्यानंतर ‘एआय समिट’चे आयोजक असलेल्या केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाचे धाबे दणाणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समिटचे (शिखर परिषद) गुरुवारी उद्घाटन होणार असून त्यासाठी एआय क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचे सीईओ, विविध देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या ‘एआय इम्पॅक्ट समिट’द्वारे भारत एआय क्षेत्रातील मोठी ताकद असल्याचे दाखवण्याची संधी असल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. मात्र ही कथित उज्ज्वल प्रतिमा भारतीय विद्यापीठानेच भंग केल्याची घटना बुधवारी समोर आली.केंद्र सरकारने या नामुष्कीतून सुटका करून घेण्यासाठी गलगोटियास विद्यापीठाच्या प्रतिनिधींना प्रदर्शनातून गाशा गुंडाळून भारतमंडपमचा परिसर सोडण्याचा आदेश दिला. हा आदेश विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी तात्काळ अमलातही आणला.
विद्यापीठाची माफी वादात सापडल्यानंतर गलगोटियास विद्यापीठाने सुरुवातीला ‘रोबो डॉग’ ही आमची निर्मिती होती, असा दावा केलाच नव्हता, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यापीठावर चहुबाजूने टीका होऊ लागल्यानंतर विद्यापीठाने माफी मागितली.
‘स्वनिर्मित नसलेल्या उपकरणांचे प्रदर्शन नको’
चिनी बनावटीच्या ‘रोबोटिक डॉग’वरून वाद सुरू असतानाच ‘एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये सहभागी झालेल्या प्रदर्शकांनी त्यांच्या मालकीची नसलेली उपकरणे प्रदर्शित करू नयेत, असा इशारा माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी दिला. अशा व्यासपीठांवर दाखवले जाणारे काम अस्सल असावे आणि उपरकणे स्वनिर्मित असावी, असे सांगतानाच कृष्णन यांनी प्रदर्शनावरील वाद टाळण्याचे आवाहन केले.
वाद कशामुळे?
’ ‘एआय एक्स्पो’मध्ये गलगोटियास विद्यापीठाच्या मंडपात ‘ओरियन’ नावाचा ‘रोबोटिक डॉग’ आकर्षण ठरला होता.
’ या प्रदर्शनातील एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्यामध्ये प्राध्यापकाने विद्यापीठाच्या ह्य्सेंटर ऑफ एक्सलन्सह्णचे रोबोटिक डॉग हे उत्तम उदाहरण असल्याचे वर्णन केले होते. त्यांच्या या दाव्यामुळे हा रोबो डॉग विद्यापीठाने स्वत: विकसित केल्याचा आभास निर्माण झाला.
’ ही चित्रफीत खुद्द केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने समाजमाध्यावर अपलोड करून कौतुक केले होते.
’ ही चित्रफीत प्रसारित होताच एआय क्षेत्रातील तज्ज्ञ व समाजमाध्यमकर्त्यांनी हा रोबो डॉग ‘युनिट्री गो-२’ म्हणून ओळखला जातो आणि हे उत्पादन चिनी कंपनी ‘युनिट्री रोबोटिक्स’ने बनवलेले आहे, तसेच,आंतरराष्ट्रीय स्तरावर हे उत्पादक विकले जात असल्याचे दाखवून दिले.
’ त्यामुळे गलगोटियास विद्यापीठाची चोरी उघड झाली. या प्रकारामुळे एआय समिटची बदनामी होऊ लागता गलगोटियास विद्यापीठाच्या प्रतिनिधींना त्यांचे मंडप रिकामे करण्याचा आदेश देण्यात आला.
’ मंडपाचा वीजपुरवठादेखील खंडित केला गेला. नंतर विद्यापीठाचे प्रतिनिधी भारतमंडपममधून निघून गेले.

