Cancer : ‘गॅलरी’ चाचणी ठरणार वरदान!; ५० हून अधिक कर्करोगाचे निदान

कर्करोग झाल्याचं कळल्यानंतर पायाखालची जमीनच सरकते. उपचाराचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. त्यामुळे उपचाराअभावी जीव गमवावा लागतो.

Blood-Cancer-2
Cancer : 'गॅलरी' चाचणी ठरणार वरदान; ५० हून अधिक कर्करोगाचे निदान (प्रातिनिधीक फोटो)

संपूर्ण जगात कर्करोगाने मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. २०२० या वर्षात कर्करोगामुळे १ कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. कर्करोग झाल्याचं कळल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकते. उपचार करायचे झाले तरी त्याचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. त्यामुळे अनेकांना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो. ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) या संस्थेनं एक आरोग्य चाचणी सुरु केली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास भारतासह अनेक देशांमध्ये कर्करोगाचं निदान आणि उपचारांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणर आहे. व्यक्तीमध्ये लक्षणं दिसण्यापूर्वी कर्करोग शोधू शकते असं सांगण्यात येत आहे. डोकं, गळा, आतडी, फुफ्फुस, अन्ननलिका या भागातील कर्करोग शोधण्यातही मदत होणार आहे. हेल्थकेअर कंपनी ग्रेलद्वारे होणारी ‘गॅलरी चाचणी’ रक्तातील कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांची तपासणी करते.

“लक्षणं दिसण्याआधीच कर्करोग शोधून काढल्यास त्यावर उपचार करण्याची उत्तम संधी आहे. लोकांना जगण्याची सर्वोत्तम संधी मिळू शकतो. जलद आणि साधी रक्त चाचणी करून कर्करोग शोधल्याने उपचार करणं सोपं होईल”, असं एनएसएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमांडा प्रीचार्ड यांनी सांगितलं आहे. “ही चाचणी यशस्वी ठरल्यास तपासासाठीचा खर्च बराच कमी होईल. तसेच उपचार करणंही सोपं होईल.”, असं गेल्या २० वर्षापासून इंग्लंडमध्ये सल्लागार रेडिओलॉजिस्ट डॉ. ममता राव यांनी इंडिया टुडेला सांगितलं. चाचणीसाठी यूकेच्या आठ भागातून १.४० लाख स्वयंसेवकांची चाचणी करण्याची योजना आहे. जेणेकरून व्यापक वापरासाठी त्याची क्षमता अधिक चांगल्या प्रकारे शोधता येईल. “गॅलरी चाचणी केवळ कर्करोगच नाही तर शरीराच्या ज्या भागामध्ये हा रोग पसरत आहे त्याबद्दल अचूक माहिती देखील देऊ शकते.”, असं ग्रेल युरोपचे भारतीय वंशाचे अध्यक्ष सर हरपाल कुमार यांनी सांगितलं.

इंग्लंडमधील छायाचित्रकार हॅरिएट बकिंघम यांना २०१३ मध्ये स्तनाच्या कर्करोग झाला होता. तोपर्यंत माझा कर्करोग अधिक वेगाने पसरला होता. पण हाच आजार मला आधी कळला असता तर उपचार जास्त त्रासदायक नसता असं त्यांनी यावेळी सांगितलं. इन्टरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संस्थेच्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये १७ दशलतक्ष लोकांना कर्करोग झाला आणि ९.५ दशलक्ष लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. तर २०१४० पर्यंत जगात २७.५ दशलक्ष लोकांना कर्करोग होईल आणि १६.३ दशलक्ष लोकांचा मृत्यू होईल असा अंदाज बांधण्यात आला आहे. दरम्यान भारतातील कर्करोग नोंदणी करणाऱ्या संस्थेने ६८ पैकी एका पुरुषाला फुफ्फुसाचा कर्करोग, २९ पैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग आणि ९ पैकी १ भारतीयाला कर्करोग होण्याचा अंदाज बांधला आहे. या चाचणीचा प्राथमिक अंदाज २०२३ सालापर्यंत येईल असं सांगण्यात येत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास एनएसएस २०२४ आणि २०२५ या वर्षात इंग्लंडमधील १० लाख लोकांची चाचणी करणार आहे. संस्थेनं आधीच ५० ते ७० वयोगटातील लोकांना चाचणीत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Galleri blood test which could detect 50 cancers even before symptoms rmt

ताज्या बातम्या