एका २२ वर्षांच्या मुलाने Reddit वर पोस्ट लिहून त्याच्या मनातली खंत बोलून दाखवली आहे. तुला जन्माला घालून चूक केली असंच आम्हाला वाटतं आहे असं आई वडील आपल्याला म्हणाले असं हा मुलगा म्हणाला आहे. हा मुलगा आयटी क्षेत्रात काम करत होता. सहा महिने नोकरी केल्यानंतर या मुलाची नोकरी गेली. त्यानंतर या मुलाने आई वडिलांनी दिलेली दुषणं सांगितली आहेत.
या मुलाने पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
Reddit वर पोस्ट करत या मुलाने म्हटलं आहे की मी पदवीधर झालो आणि त्यानंतर मी आयटी क्षेत्रात काम करायला सुरूवात केली. मला महिना ९५ हजार रूपयांची नोकरी लागली होती. मी सहा महिने नोकरी केली. पण मागील दोन महिन्यांपासून मी काही कमवू शकलेलो नाही कारण माझी नोकरी गेली, आता मी दुसरी नोकरी शोधतो आहे. पण माझे आई वडील मला जे टोमणे मारत आहेत ते मला असह्य होत आहेत. माझा प्रत्येक दिवस असे टोमणे ऐकण्यात जातो. मला आई वडील म्हणाले आम्हाला वाटतंय तुला जन्म देऊन चूक केली.
माझ्या आई वडिलांना आता माझं ओझं झालं आहे असं वाटू लागलं आहे
या मुलाने म्हटलं आहे मला रोज ऐकावं लागतं की आम्ही तुला जन्म देऊन चूक केली. माझी नोकरी गेली आहे २ महिने झाले आहेत. नोकरी होती तोपर्यंत आई वडील काही म्हणत नव्हते. सगळं काही चांगलं चाललं होतं. आता त्यांना अचानक माझं ओझं वाटू लागलं आहे. यातला सर्वात वाईट अनुभव मला तेव्हा आला जेव्हा मी जेवायला बसलो तेव्हा मला आई वडील म्हणाले जे तू जेवतो आहेस ते जेवण फुकट येत नाही. मी रोज दिवस-रात्र नवी नोकरी शोधतो आहे. पण स्पर्धेच्या या जगात नोकरी मिळवणं किती कठीण आहे तुम्हाला ठाऊक आहेच. आई वडिलांनी मला जी काही दुषणं देणं सुरू केलंय त्यामुळे मी मागचे दोन दिवस जेवलोही नाही. मी जेवण मिळेल का हे विचारू का याचीही माझी हिंमत होत नाही असंही या मुलाने म्हटलं आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.
नेटकऱ्यांनी काय म्हटलंय?
या मुलाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी उत्तरं दिली आहेत, एका युजरने म्हटलं आहे तू तुझ्या हिशोबाने तुझं आयुष्य जग, आई वडील जे बोलत आहेत त्याकडे लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या आयुष्यात पुढे जा, निराश होऊ नकोस असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. तर आणखी एक युजर म्हणाला आई वडिलांना सांग की तुला हे सगळं वाटतं आहे, त्यांच्याशी चर्चा कर ते समजून घेतील. तर काहींनी असंही विचारलं आहे की तू ९५ हजार रूपये महिना पगार कमवत होतास तर तू पैसे साठवले नाहीस का? दुसऱ्या एकाने म्हटलं आहे की सध्या तुझा कठीण काळ आहे, तुझे आई वडील तुझ्याशी जे वागत आहेत ते विसरू नकोस. त्यांना कृतीने उत्तर दे, त्यांच्याशी वाद घालू नकोस.
