गलवान व्हॅली जवळ जवान आणि अधिकारी क्रिकेट खेळत असल्याची छायाचित्रे लष्कराने प्रसिद्ध केली आहेत. एवढ्या अतिउंच प्रदेशात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, चीनच्या नजरेला नजर देत, भक्कमपणे सीमेचे रक्षण करत असतांना त्यामध्ये सहजता आहे, दबाव नाही असं सांगत मनोधैर्य उच्च असल्याचं एक प्रकारे लष्कराने या छायाचित्रांच्या माध्यमातून सांगितलं आहे. संबंधित छायाचित्रे ही वादग्रस्त ठरलेल्या लडाखमधील Point-14 पासून काही अंतरावर एका मोकळ्या जागेतील असल्याचं टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हंटलं आहे. तर संबंधित फोटो हे पटियाला ब्रिगेडमधील तीन क्रमांकाच्या Infantry 'Trishul' Division च्या जवान-अधिकाऱ्यांचे आहेत असं लेह मधील लष्कराच्या १४ व्या Corps ने स्पष्ट केलं आहे. २० डिसेंबर २०२२ ला भारत आणि चीन दरम्यान १७ वी चर्चेची फेरी झाली होती, ज्यामध्ये लडाखमधील वादग्रस्त सीमा तसंच गस्त घालण्याच्या सीमारेषेबद्दल आणि सैन्य माघारीबद्दल चर्चा झाली होती. आता लवकरच पुढची चर्चेची फेरी होणार आहे. हे निमित्त साधत लष्कराचे मनोधैर्य उच्च आहेत असं सांगणारे फोटो प्रसिद्ध करण्यात आल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. लडाखमधील Depsang Plains आणि Demchok भागाजवळ असलेले सैन्य काढून घेण्यास चीनने याआधीच नकार दिला आहे. उलट गलवान व्हॅलीमध्ये १५ जून २०२० ला लष्करावर केलेल्या हल्ल्यानंतर लडाख सीमेवर सैन्य चीनने वाढवले आहे, पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली आहे, आता तर पँगाँग सरोवरावर मोठा पूल बांधत आहे. याला उत्तर म्हणून भारतीय लष्कराने ५० हजार पेक्षा जास्त सैन्य लडाखमधील चीनच्या सीमेवर तैनात केलं असून वर्षभर शस्त्रसज्जता राहील याची काळजी घेतली आहे.