यापुढे केंद्रीय राखीव पोलिसांचा समावेश असलेली ‘झेड प्लस’ व्यवस्था

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वढेरा या गांधी कुटुंबातील तीनही सदस्यांची एसपीजी कमांडोंची सुरक्षाव्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतली असून केंद्रीय राखीव पोलिसांचा समावेश असलेली झेड प्लस सुरक्षा त्यांना पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच ‘एसपीजी’ सुरक्षाव्यवस्था असेल.

‘आयबी’ आणि ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गांधी कुटुंबाच्या जिवाला असणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत आढावा घेतल्यानंतरच सुरक्षेत कपात करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणे आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षाही काढून घेण्यात आली होती.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोघांचीही हत्या झाली होती. ही वस्तुस्थिती माहिती असूनही सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. सोनिया, राहुल आणि प्रियंका यांच्या जिवाशी मोदी सरकार खेळत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी केला आहे.

पंतप्रधान आणि त्यांच्या नजीकच्या कुटुंबीयांनाच एसपीजी सुरक्षाव्यवस्था दिली जाते. मात्र, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी गांधी कुटुंबाच्या जिवाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन एसपीजी कायद्यात दुरुस्ती केली. त्यानंतर गांधी कुटुंबातील तिघाही सदस्यांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, गांधी कुटुंबाने वेळोवेळी एसपीजी सुरक्षा न घेताच प्रवास केला असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. गेल्या अठरा वर्षांमध्ये राहुल गांधी १५६ वेळा परदेशात गेले त्यापैकी १४३ वेळा त्यांनी एसपीजी सुरक्षा घेतलेली नव्हती. शिवाय, अनेकदा त्यांच्या परदेश दौऱ्याची माहिती ऐनवेळी दिली जात होती. देशांतर्गत प्रवासांतही राहुल गांधी यांनी बुलेटप्रूफ गाडीचा वापर टाळला होता. त्यांनी एसपीजी सुरक्षा न घेताच अनेकदा देशात प्रवास केल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८५ मध्ये विशेष कायदा करून पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजी कमांडो तैनात करण्यात आले. पण राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कायद्यात दुरुस्ती करून माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना दहा वर्षे एसपीजी सुरक्षा देण्यात आली. २००३ मध्ये वाजपेयी यांनी गांधी कुटुंबाच्या एसपीजी सुरक्षेत वाढ केली होती.

सूडबुद्धीने निर्णय- काँग्रेसची टीका

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ पासून गांधी कुटुंबाला एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेत केलेली कपात हा मोदी-शहा यांनी वैयक्तिक सूडबुद्धीतून घेतलेला निर्णय असल्याची टीका काँग्रेसने केली असून शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘६-कृष्ण मेनन’ मार्गावरील निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.