पीटीआय, राजकोट : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या आठ वर्षांतील कामगिरीवर प्रकाश टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी, महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या स्वप्नातील भारताच्या उभारणीसाठी काम करीत असल्याचे प्रतिपादन केले.  पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘गेल्या आठ वर्षांपासून केंद्र सरकारने महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सरकारने गरिबांची प्रतिष्ठा जपण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले.’’

गुजरातमधील राजकोट येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी करोना विषाणू साथीच्या काळात केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली. ‘‘जेव्हा करोनाची जागतिक साथ सुरू झाली तेव्हा गरिबांपुढे अन्नपाण्याचा प्रश्न होता. सरकारने त्यांच्यासाठी धान्याची कोठारे उघडली,’’ असे मोदी म्हणाले. 

मोदी सरकारला २६ मे रोजी आठ वर्षे पूर्ण झाली. त्यासंदर्भात पंतप्रधान म्हणाले, की गेल्या आठ वर्षांत देशाचे कल्याण आणि गरिबांची सेवा यांसाठीच्या प्रयत्नांत मी कोणतीही कसर ठेवली नाही. एकाही देशवासीयाची मान शरमेने झुकेल, असे कोणतेही कृत्य माझ्याकडून आतापर्यंत घडलेले नाही.

मोदी यांनी केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांत केलेल्या कामांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘महात्मा गांधी यांना, गरीब, दीन-दलित, आदिवासी आणि स्त्रियांचे सबलीकरण व्हावे, असे वाटत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी स्वदेशी उपाय अंगीकारावेत, असे त्यांना वाटत होते. माझ्या सरकारने या सर्व क्षेत्रांत प्रभावी काम केले आहे.’’ आठ वर्षांच्या काळात तीन कोटींपेक्षा जास्त कुटुंबीयांना पक्की घरे देण्यात आली. १० कोटी कुटुंबीयांसाठी स्वच्छतागृहे बांधून दिल्याने उघडय़ावर शौचास जाण्याच्या लाजिरवाण्या प्रकारांपासून त्यांची मुक्तता झाली. गॅस जोडणी मिळवून दिल्याने सुमारे नऊ कोटी महिलांची धुरापासून मुक्तता झाली. अडीच कोटी कुटुंबीयांना वीजजोडण्या देण्यात आल्या. सहा कोटी जनतेला नळाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पंतप्रधान जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचारांसाठी ५० कोटी नागरिकांचा आरोग्य विमा उतरवण्यात आला, असे मोदी यांनी सांगितले. ही केवळ आकडेवारी नाही, असे स्पष्ट करून मोदी म्हणाले, की गरिबांचे कल्याण आणि त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या सरकारच्या बांधिलकीचा हा पुरावा आहे. गरिबांच्या उद्धारासाठी माझ्या सरकारने गेल्या आठ वर्षांत सातत्याने प्रयत्न केले. ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास और सब का प्रयास’ या मंत्रानुसार आम्ही देशाच्या विकासाला नवी दिशा दिली.

गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील अकोट येथील २०० खाटांच्या रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळय़ात मोदी बोलताना मोदी यांनी पाटीदार समाज विश्वस्त संस्थेने ग्रामीण भागासाठी उभारलेल्या या रुग्णालयाबद्दल त्यांचे कौतुक केले. आपण अशी जीवनशैली विकसित करू, की कुणीही आजारी पडणार नाही आणि रुग्णालये रिकामी राहावीत, असेही मोदी म्हणाले.

गुजरातची भरारी!

गुजरात विधानसभा निवडणूक सहा महिन्यांवर असताना मोदी यांचा दौरा सहेतुक होता. ‘डबल इंजिन सरकार’मुळे (केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार) गुजरातचा २०१४ नंतर वेगवान विकास झाला. ‘डबल इंजिन सरकार’मुळे गुजरात विकासाची नवनवी शिखरे गाठत आहे. २०१४ पूर्वी वेगळी परिस्थिती होती. तत्कालीन केंद्र सरकारकडे एखाद्या विकास प्रकल्पाचा प्रस्ताव पाठवल्यास तो नाकारला जात असे, अशी टीकाही मोदींनी केली.

‘मी गरिबी अनुभवली..’

मी गरिबी पुस्तकांतून किंवा दूरचित्रवाणीद्वारे समजून घेतलेली नाही. मी गरिबीचे अनुभव घेतले आहेत, असे सांगून मोदी म्हणाले, की करोना साथीच्या संकटात सरकारने गरिबांसाठी अन्नधान्याचे साठे खुले केले. अन्नपुरवठय़ात अडथळे येऊ लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. साथीच्या काळात महिलांच्या जन धन बँक खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात आली. 

शेतकऱ्यांना अल्प किमतीत खते

करोना साथ आणि युक्रेनमधील युद्धामुळे खतांच्या किमतींत वाढ झाली. परंतु शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासू नये यासाठी उपाययोजना केल्या. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आवश्यक ते सर्वकाही सरकारने केले, असे मोदी यांनी सहकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. आयात युरिया खताची ५० किलोची ३५०० रुपयांची पिशवी सरकारने शेतकऱ्यांना केवळ ३०० रुपयांना उपलब्ध केली. त्यासाठी सरकारी तिजोरीतून ३२०० रुपयांची तजवीज करण्यात आली, असेही मोदी म्हणाले.

गेल्या आठ वर्षांत देशकल्याण आणि गरिबांची सेवा करण्यात मी कोणतीही कसर ठेवली नाही. एकाही देशवासीयाची मान शरमेने झुकेल, असे कोणतेही कृत्य माझ्याकडून घडलेले नाही.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान