पीडितेच्या आईने काय म्हटलं आहे?दिल्लीत एका १६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं प्रकरण सोमवारीच समोर आलं. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बस चालक आणि कंडक्टर यांनी मुलीला स्लीपर कोच बसमध्ये बसवलं आणि त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला असा आरोप पीडित मुलीने केला आहे. यानंतर या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपीच्या आईने ही प्रतिक्रिया दिली आहे की माझ्या मुलाला या प्रकरणात अडकवलं गेलं आहे.
नेमकी घटना काय घडली?
१६ वर्षांची मुलगी ४ ऑगस्टच्या रात्री घरातून कुणालाही न सांगता नोएडा या ठिकाणी राहणाऱ्या चुलत भावला भेटण्यासाठी निघाली होती. मात्र पाऊस मोठ्या प्रमाणावर पडू लागल्याने अंधार झाला आणि तिला स्टॉप कळला नाही त्यामुळे ती ग्रेटर नोएडातील परी चौक या ठिकाणी चुकून उतरली. या मुलीला परी चौकातून पुढे जायचं होतं. तिला एक स्लीपर बस जाताना दिसली. त्या मुलीने हात केला त्यामुळे बस थांबली. बस चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांनी बस नोएडा सेक्टर ६३ च्या दिशेन जाते आहे असं सांगितलं. त्या मुलीला विश्वासाने बसमध्ये बसवलं. बस सुरु झाल्यानंतर काही वेळाने कंडक्टरने या मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चालक आणि कंडक्टर या दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. मुलीने या दोघांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काश्मीर गेट आयएसबीटी जवळच्या रिंग रोडवर या पीडितेला फेकण्यात आलं आणि आरोपींनी पळ काढला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. मात्र माझ्या मुलाला अडकवलं जात असल्याची प्रतिक्रिया आरोपीच्या आईने दिली आहे.
आरोपीच्या आईने काय म्हटलं आहे?
“जे काही घडलं आणि घडतंय ते चुकीचं आहे. माझा मुलगा निर्दोष आहे. माझ्या पतीची दोन महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली. मला वाटतं आहे की कदाचित त्याच लोकांनी माझ्या मुलाला अडकवलं असेल. त्या लोकांनी आमच्या शेतावर कब्जा केला. त्याच आरोपींनी माझ्या मुलाला यात अडकवलं असेल. सरकारकडे हात जोडून एकच विनंती आहे. आमच्या मुलाने काहीही केलं नाही त्याला निर्दोष सोडवलं गेलं पाहिजे”
ज्यांनी जमिनीच्या वादातून माझ्या पतीची हत्या केली त्याच लोकांनी माझ्या मुलाला या प्रकरणात अडकवलं आहे. असं आरोपीच्या आईने म्हटलं आहे. आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ४ ऑगस्टच्या बलात्काराच्या घटनेनंतर बस चालक आणि कंडक्टर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. आता आरोपीच्या आईने जी प्रतिक्रिया दिली आहे त्यानंतर पोलीस काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल.
