युकेडर (Ecuador) देशाच्या सर्वात मोठ्या तुरुंगात दोन गँगमध्ये झालेल्या मारामारीत आतापर्यंत तब्बल ११६ कैद्यांचा मृत्यू झालाय. याशिवाय जवळपास ८० कैदी जखमी झालेत. या घटनेची जगभरात चर्चा होतेय. युकेडरचे अध्यक्ष गुलेर्मो लासो (Guillermo Lasso) यांनी याची दखल घेत तातडीने अतिरिक्त सुरक्षा दल आणि निधी देत परिस्थिती आटोक्यात आणण्याचे आश्वासन दिलंय. तसेच ही घटना पुन्हा होऊ नये यासाठी निर्देश दिलेत.

युकेडरच्या गुयास प्रांतातील (Guayas province) तुरुंगात मंगळवारी (२८ सप्टेंबर) दोन गँगमध्ये भांडण झालं. तुरुंगावर कुणाचं नियंत्रण असणार या विषयावर या दोन्ही गटात वाद होता. त्याचं रुपांतर दंगलीत झालं आणि मोठा हिंसाचार झाला. विशेष म्हणजे तुरुंगामध्ये कैद्यांनी बंदुकांचा वापर करत बेछुट गोळीबार केला. चाकूचे हल्ले आणि स्फोटकांचाही वापर झाला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तसेच तुरुंग सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

युकेडरचे अध्यक्ष लासो म्हणाले, “गुन्हेगारी गट वर्चस्वासाठी तुरुंगाला युद्धाचं मैदान बनवत आहेत हे दुर्दैवी आहे. मी देवाला युकेटरला आशीर्वाद देण्याची आणि पुन्हा युकेडरमध्ये असा हिंसाचार होऊ नये यासाठी प्रार्थना करतो.” लासो यांनी मृत आणि जखमी कैद्यांच्या कुटुंबीयांना मदतीचं आश्वासनही दिलंय.

“युकेडरमध्ये कैद्यांमधील हिंसाचाराची ही पहिलीच घटना नाही”

युकेडरमधील या घटनेने जगाचं लक्ष वेधलंय. मात्र, ही युकेडरमधील कैद्यांच्या हिंसाचाराची पहिलीच घटना नाही. याआधी फेब्रुवारी आणि जुलै २०२१ मध्ये देखील देशभरात विविध तुरुंगांमध्ये अशाच टोळी युद्धाच्या घटना घडल्या होत्या. फेब्रुवारीतील हिंसाचारात जवळपास ७९ कैद्यांचा मृत्यू झाला. तसेच जुलैच्या हिंसाचारात २२ कैद्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : उत्तराखंडमधील भागात चीनची घुसखोरी?