केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मागच्यावर्षी धमकीचा फोन करणारा आणि खंडणी मागणाऱ्या गँगस्टर जयेश पुजारीचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. कर्नाटकच्या बेळगावमधील न्यायालयात त्याला सुनावणीसाठी आणले असताना वकील आणि न्यायालय परिसरातील लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. जयेश पुजारीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर वकील आणि इतर लोकांनी रागातून मारहाण केल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी लोकांच्या गराड्यातून सुरक्षितरित्या जयेश पुजारीला बाहेर काढल्याचे व्हिडीओमधये दिसत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारीने न्यायालय परिसरात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यानंतर रागावलेल्या लोकांनी ही हिंसात्मक प्रतिक्रिया दिली. २०१८ मध्ये केलेल्या एका गुन्ह्याशी संबंधित सुनावणीसाठी पुजारीला हिंडल्गाच्या केंद्रीय कारागृहातून बेळगावच्या न्यायालयात आणले गेले होते.

वरीष्ठ पोलिसांनी सांगितले की, पुजारीने पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी का केली? याचे कारण आम्हालाही समजले नाही. त्याचा आम्ही तपास करत आहोत. सध्या पुजारीवर दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल आहे. त्यासंदर्भात त्याच्याविरोधात खटला सुरू आहे.

बुधवारी पुजारीला न्यायालय परिसरात आणताच तो न्यायालयातच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देऊ लागला. यानंतर वकिलांनी आणि इतर लोकांनी त्याच्या दिशेने धाव घेत, त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांसमोर अडचण उभी राहिले. पोलिसांनी सुरक्षेचे कडे करत त्याला न्यायालयाच्या बाहेर काढले. वरीष्ठ पोलिसांनी सांगितले की, आमच्याकडे या घटनेचे चित्रीकरण आहे. त्याची तपासणी करत आहोत. त्याने पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देताच लोकांनी त्याच्याकडे धाव घेतली. मात्र त्याला यातून खरंच जखम झाली का? याचा तपास करत आहोत.

जयेश पुजारीच्या विरोधात कलम २९५ अ आणि कलम ५०५ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविले गेले आहे.