कुख्यात गँगस्टरने जेलमध्ये केले खून; एन्काऊंटरमध्ये स्वतःही मारला गेला!

खून झालेल्या कैद्यांपैकी एकजण त्या भागातले नेते मुख्तार अन्सारी यांचा खास माणूस असल्याचं सांगितलं जात आहे.

Jail
(संग्रहित छायाचित्र)
कारागृहात झालेल्या गोळीबारात दोन कैद्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येत आहे. उत्तर प्रदेशातल्या चित्रकूट कारागृहात ही घटना घडली आहे. या गोळीबारात मृत्युमुखी पडलेला एक गुन्हेगार हा बाहुबली विधायक असं संबोधल्या जाणाऱ्या मुख्तार अन्सारी यांचा खास माणूस असल्याचं सांगण्यात य़ेत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पूर्वांचलचा कुप्रसिद्ध गँगस्टर अंशु दिक्षीत याला नुकतंच सुल्तानपूर कारागृहातून चित्रकूट कारागृहामध्ये हलवण्यात आलं होतं. त्याने केलेल्या गोळीबारात चित्रकूट कारागृहातले कैदी मुकीम काला आणि मेराज यांचा खून झाल्याची बातमी येत आहे. मुकीम काला हा पश्चिम उत्तर प्रदेशातला मोस्ट वाँटेड गँगस्टर आहे तर मेराज हा नेते मुख्यार अन्सारी यांचा खास असल्याचं सांगितलं जात आहे.

आजतकच्या वृत्तानुसार, मुन्ना बजरंगी याच्या हत्येनंतर मेराज हा अन्सारी यांच्या अगदी जवळचा व्यक्ती बनला होता. कारागृहातल्या या गोळीबारानंतर कारागृह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची एक टीम तिथे दाखल झाली. तेव्हा अंशु दिक्षीत आणि पोलिसांच्या या टीममध्येही धुमश्चक्री झाली. यावेळी अंशु दिक्षीत एन्काऊंटरमध्ये मारला गेला.

चित्रकूट कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अंशु दिक्षीतने मुकीम काला आणि मेराज या दोघांना मारल्यानंतर पाच कैद्यांना ओलीस धरलं होतं. कारागृह प्रशासनाने त्या कैद्यांना सोडण्याचं आवाहन करुनही त्याने ऐकलं नाही. यातदरम्यान पोलीस आणि अंशु यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत अंशु ठार झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gangster killed in encounter in jail uttar pradesh chitrakut jail vsk