हरियाणातील कुख्यात गँगस्टर मेनपाल ढिल्ला उर्फ बादली याला लग्नासाठी १२ तासांचा कस्टडी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. तीन हत्येच्या प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला ५० वर्षीय ढिल्ला गुरुवारी (२४ सप्टेंबर २०२६) आपल्या कंबोडियन जोडीदार मेटा चॅनबरोबर विवाह करणार आहे. हिसार मध्यवर्ती कारागृहामधून सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत त्याला तुरुंगाबाहेर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. पॅरोलची मुदत संपण्यापूर्वी त्याला पुन्हा तुरुंगात दाखल व्हावे लागणार आहे. याबाबत सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
झज्जर-गुरुग्राम रोडवरील फार्महाऊसमध्ये लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, ढिल्ला आणि मेटा चॅन यांचा विवाह झज्जर-गुरुग्राम रोडवरील दुलिना फार्ममध्ये होणार आहे. मेटा चॅन आणि तिच्या कुटुंबातील सदस्य यापूर्वीच झज्जरमध्ये दाखल झाले आहेत. दोघांचा विवाह हिंदू पद्धतीने होणार असून, या सोहळ्याला त्यांची मुलेही उपस्थित राहणार आहेत. कंबोडियातून भारतात आलेल्या मेटा चॅनबरोबर चार मुले असल्याचे सध्याच्या लग्नासंदर्भातील वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
ढिल्लावर २२ गुन्हे दाखल
मेनपाल ढिल्लावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, कट रचणे आणि बेकायदा शस्त्र बाळगणे यांसारख्या गुन्ह्यांसह सुमारे २२ गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येते. तो झज्जर जिल्ह्यातील बादली गावचा रहिवासी आहे. त्याचा गुन्हेगारी इतिहास २००० सालापासून सुरू असल्याचे वृत्तात नमूद आहे. २०१४ मध्ये भोंडसी कारागृहात असतानाही एका कैद्याच्या हत्येप्रकरणी त्याचे नाव समोर आले होते.
२०१८ मध्ये पॅरोलवर बाहेर आला अन् कंबोडियाला पळाला
ढिल्लाला २०१८ मध्ये हिसार मध्यवर्ती कारागृहामधून सहा आठवड्यांचा पॅरोल मिळाला होता. मात्र, पॅरोलची मुदत संपल्यानंतर तो पुन्हा तुरुंगात परतला नाही. त्यानंतर त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवल्याचा आरोप आहे. जुलै २०१९ मध्ये तो कंबोडियातील सिएम रीप येथे पोहोचला आणि तिथे व्यवसाय सुरू करून राहू लागला. याच काळात त्याची मेटा चॅनबरोबर ओळख झाली आणि दोघांनी कुटुंब सुरू केले. पॅरोलवरून फरार झाल्यानंतर हरियाणा पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी बक्षीस जाहीर केले होते आणि मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत त्याचा समावेश केला होता.
इंटरपोलच्या रेड नोटिसनंतर कंबोडियात अटक
ढिल्लाविरोधात ६ नोव्हेंबर २०२४ रोजी इंटरपोल रेड नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर कंबोडियन अधिकाऱ्यांनी २४ जुलै २०२५ रोजी त्याला अटक केली. यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. २ सप्टेंबर २०२५ रोजी हरियाणा विशेष तपास पथकाने त्याला ताब्यात घेतले. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.
लग्नासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था
१२ तासांच्या कस्टडी पॅरोलदरम्यान ढिल्लाबरोबर मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. झज्जरचे पोलीस उपायुक्त शुभम सिंह यांच्या माहितीनुसार, लग्नाच्या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या विवाह सोहळ्याच्या संपूर्ण प्रवासादरम्यान आणि सुरक्षेसाठी झज्जरच्या दोन गुन्हे शाखांच्या पथकांसह १५ शस्त्रसज्ज पोलीस कर्मचारी असतील. तसेच, सदर झज्जर पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह २५ जणांचे पथक लग्नस्थळी तैनात केले जाणार आहेत. पॅरोलची मुदत संपल्यानंतर रात्री आठ वाजता ढिल्लाला पुन्हा हिसार मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात येणार आहे.
