Premium

“ना कोचिंग, ना लाखोंचा खर्च”, यूपीएससीत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्र

यूपीएससीत इशिता किशोरने देशात प्रथम क्रमांक मिळवला असून ठाण्याची कश्मिरा संखे महाराष्ट्रात पहिली आली आहे.

Garima Lohia
गरिमा लोहिया (PC : Tarkishore Prasad Facebook)

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर केला. त्यात इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. देशातल्या पहिल्या चारही क्रमांकांवर मुलीचंच वर्चस्व दिसून आलं. देशातल्या पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुलं आहेत. संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इशिताची देशभर चर्चा आहेच. त्यासोबत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या गरिमा लोहिया हिचंदेखील कौतुक होत आहे. विशेष म्हणजे गरिमाने कोणत्याही खासगी क्लासेसला न जाता घरीच परिक्षेची तयारी केली आणि देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपला पाल्य यूपीएससी ही नागरी सेवा परिक्षा उत्तीर्ण व्हावा म्हणून अनेक पालक मुलांच्या खासगी क्लासेसवर लाखो रुपये खर्च करतात. परंतु गरिमा लोहियाने घरीच अभ्यास करून ती या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. टीव्ही ९ भारतवर्षशी बोलताना गरिमा म्हणाली की, मी काहीतरी करून दाखवण्याचा निर्धार केला होता. आपल्या वाटेत कितीही अडथळे आले तरी थांबायचं नाही असं मी ठरवलं होतं.

गरिमाने सांगितलं की, तिने ही परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ पुस्तकांची मदत घेतली. तसेच ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती त्यासाठी तिने गूगलची मदत घेतली. तिला पहिल्याचं प्रयत्नात या परिक्षेत उत्तीर्ण व्हायचं होतं. परंतु पहिल्या प्रयत्नात ती अपयशी ठरली. तरीदेखील तिने दुसऱ्यांदा प्रयत्न करायचं ठरवलं. दुसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली. दोन्ही परिक्षांच्या वेळी तिला स्वतःवर विश्वास होता की, ती उत्तीर्ण होईल. परंतु पहिल्यांदा परिक्षा दिली तेव्हा ती काही गुणांनी मागे पडली. त्यावेळी ती थोडी निराश झाली होती. परंतु तिच्या आईने तिचा आत्मविश्वास वाढवला.

गरिमा म्हणाली, “मी स्वतःला खूप नशीबवान मानते. याआधी इतकी आनंदी कधीच झाले नव्हते. मी माझ्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय याचा खूप आनंद आहे. माझ्या मुलीने अधिकारी व्हावं असं माझ्या आई-वडिलांचं स्वप्न होतं. त्यांचं मागणं देवाने ऐकलंय. आज माझे बाबा असते तर खूप आनंदी झाले असते.” गरिमाच्या वडिलांचं २०१५ साली निधन झालं आहे.

गरिमाने बक्सरमधून तिचं १० वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. परंतु उच्च शिक्षण मिळवणं ही तिची सर्वात मोठी अडचण होती. कारण बक्सर हे खूपच छोटं शहर आहे. तिथे चांगल्या शाळा आणि महाविद्यालयांचा आभाव आहे. त्यामुळे इंटरचं शिक्षण घेण्यासाठी गरिमाच्या आई-वडिलांनी तिला वाराणसीला पाठवलं. १२ वीनंतर ती दिल्लीला गेली. तिथल्या किरोडीमल महाविद्यालयातून तिने बीकॉमपर्यंतचं शिक्षण घेतलं.

हे ही वाचा >> “मी बोलतोय ते लिहून ठेवा, नितीश कुमारांची अवस्था…”, प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

गरिमा म्हणाली, तिचे आई-वडील हे तिचे प्रेरणास्त्रोत आहेत. गरिमा जिथली रहिवासी आहे, त्या भागात मुलींचं १० वीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर त्यांचं लग्न लावून दिलं जातं. परंतु गरिमाचे आई वडील त्याविरोधात होते. उलट तिच्या पालकांनी तिला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. त्यामुळेच आज ती एवढं मोठं यश मिळवू शकली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Garima lohia become upsc 2nd topper without coaching asc

First published on: 23-05-2023 at 17:36 IST
Next Story
PM Modi in Sydney: मोदींनी सिडनीतील भाषणाच्या सुरुवातीलाच केला ‘या’ व्यक्तींचा उल्लेख; म्हणाले, “थँक यू फ्रेंड अँथनी…!”