भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील गौरव भाटिया यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात तब्बल २ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. सोशल मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून तयार करण्यात आलेल्या एका बनावट ग्राफिक्सद्वारे आपली बदनामी केल्याचा गंभीर आरोप भाटिया यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त ‘बार अँड बेंच’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

या प्रकरणात सीजेपीचे नेते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईसह या नेत्यांवर कोणतीही बदनामीकारक सामग्री पोस्ट करण्यास बंदी घालण्याची मागणी गौरव भाटिया यांनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावरील एका एआय-जनरेटेड (AI-generated) पोस्टशी संबंधित आहे. सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान निशू आझाद हिच्या वडिलांवर झालेल्या हल्ला प्रकरणात स्वतंत्र भारद्वाज हा आरोपी आहे. सीजेपी नेते सौरव दास यांनी आपल्या एक्स (X) खात्यावरून एक एआय-निर्मित पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये गौरव भाटिया यांनी स्वतंत्र भारद्वाज यांना “दिमागी नक्षल” (वैचारिक नक्षलवादी) म्हटल्याचा खोटा दावा करण्यात आला होता.

हे विधान आपण कधीही केले नसल्याचे स्पष्ट करत गौरव भाटिया यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सौरव दास यांना संबंधित पोस्ट हटवण्यासाठी आणि २४ तासांच्या आत बिनशर्त माफी मागण्यासाठी इशारा दिला होता.

एआय पोस्ट हटवली, पण….

भाटिया यांच्या इशाऱ्यानंतर सौरव दास यांनी ती पोस्ट डिलीट केली खरी, परंतु ही इमेज एआयने तयार केल्याचे स्पष्टीकरण देत त्यांनी भाटिया यांनाच “तुम्ही एआयने केलेल्या या विधानाशी असहमती दर्शवता का?” असा उलट प्रश्न विचारला.

दरम्यान, सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका यांनी सौरव दास यांची हीच विवादित पोस्ट आपल्या एक्स अकाउंटवरून रीपोस्ट केली आणि भाजप नेत्यांची टिंगल उडवणारे कॅप्शन लिहिले. यापूर्वी रांका यांनी सीजेपीच्या इतर सहकाऱ्यांसह स्वतंत्र भारद्वाज यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली होती.

“सोशल मीडिया ट्रायल नाही, कोर्टातच सत्याचा निकाल”

या प्रकरणी गौरव भाटिया यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून न्यायालयात धाव घेतल्याची माहिती दिली. “जेव्हा आरोप आपल्या सीमा ओलांडतात, तेव्हा कायदा स्वतःची रेषा आखतो. आता कोणताही सोशल मीडिया ट्रायलची लढाई होणार नाही; फक्त तथ्य, पुरावे आणि कायद्याचे राज्य असेल. सत्याची परीक्षा कोर्टातच होईल,” असा इशारा भाटिया यांनी दिला आहे.