Gautam Adani US Fraud Case: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या अब्जाधीश गौतम अदाणी यांना लवकरच फसवणुकीच्या खटल्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकी अधिकारी अदाणी यांच्याविरोधातील फसवणुकीच्या आरोपांवर पडदा टाकण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत, अशी ब्लूमबर्गच्या वृत्तातून अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकी न्याय विभाग याच आठवड्यात आरोप मागे घेत असल्याची घोषणा करू शकतो, असे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे.

फसवणुकीचा खटला माघारी घेण्याची शक्यता

अदाणी यांच्याशी निगडीत फसवणुकीचे खटले माघारी घेण्यात आल्यास अदाणी समूहाला खूप मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे अदाणी समूहाला आंतरराष्ट्रीय भांडवल बाजारात पुन्हा एन्ट्री करुन साम्राज्य विस्तार करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन देखील नोव्हेंबर २०२४ मध्ये अदाणी आणि इतरांविरुद्ध दाखल केलेला दिवाणी स्वरुपाचा फसवणुकीचा खटला माघारी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दंड वसूल होणार?

अमेरिकी न्याय विभागाने फसवणुकीचे आरोप माघारी घेतले तरी, आरोपी देशाबाहेरील असल्यामुळे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन अदाणी यांच्याकडून काही प्रमाणात आर्थिक दंडाची वसूली करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्रुकलिनमधील अमेरिकेच्या ॲटर्नी कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिल्याचे वृत्त एनडीटीव्हीने प्रसिद्ध केले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अदाणी आणि इतरांनी भारतात सौर-ऊर्जा करार करण्यासाठी २५० दशलक्ष डॉलर्सच्या लाचखोरीला चालना देण्यास मदत केली, असा आरोप ब्रुकलिनमधील यूएस ॲटर्नी कार्यालयाने केला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात यूएस ॲटर्नी कार्यालयाने विविध आरोप केले होते. दरम्यान, अदाणी समूहाकडून या आरोपांचे सातत्याने खंडन करण्यात आले. एवढेच नव्हे तर समूहाकडून या खटल्यात कोणीही सुनावणीसाठी हजेरी लावली नसल्याचे सांगितले जाते.

अदाणी समूहाकडून खटला रद्द करण्याची मागणी

सौर ऊर्जा कंत्राटे मिळवण्यासाठी अदाणी आणि इतरांनी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याचे आश्वासन दिले होते, असा आरोप न्याय विभागाने केला होता. न्याय विभागाचा खटला थांबला असला तरी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या खटल्याची न्यायालयात कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, अदाणी समूहाच्या वकिलांनी एसईसी फसवणुकीचा खटला रद्द करण्याची मागणी या वर्षाच्या सुरुवातीला केली होती.