जगभरातल्या टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. भारतातले प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी दोघेही हा यादीतून बाहेर पडले आहेत. २४ जानेवारी २०२३ रोजी अमेरिकेतली रिसर्च फर्म हिंडनबर्गने अदाणी समुहाबद्दल एक अहवाल जाहीर केला. हा अहवाल समोर आल्यानंतर अदाणी समुहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली आहे. शेअर्स पडल्यामुळे अदाणी यांची नेटवर्थ एका आठवड्यात खूप कमी झाली आहे. परिणामी जगातल्या १० सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीतून गौतम अदाणी यांचं नाव बाहेर झालं आहे.
हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे एकाच आठवड्यात अदाणींची नेटवर्थ खूप घसरली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार गौतम अदाणी यांची संपत्ती आता ८४.४ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. या नेटवर्थच्या जोरावर ते जगातले १२ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. याआधी ते दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते.
हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये काय आहे?
अमेरिकेतील फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था Hindenberg Research ने एक अहवाल जारी केला आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, अदाणी यांच्या कंपन्या शार्ट पोझिशनवर आहेत. तसेच कंपन्यांच्या कर्जावर देखील सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. संस्थेने अदाणी समुहाला ८८ प्रश्न विचारले आहेत. तर अदाणी समुहाने हा अहवाल निराधार असल्याचं म्हटलं आहे.
मुकेश अंबानी १२ व्या नंबरवर
Bloomberg Billionaires Index च्या ताज्या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी देखील जगातल्या १० सर्वात श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. ते आता अब्जाधीशांच्या यादीत १२ व्या स्थानी आहेत. अंबानी यांची एकूण नेटवर्थ ८२.२ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
हे ही वाचा >> “एकेकाळी इतर देशांवर अवलंबून असलेला आपला भारत देश आज…” राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कौतुक
पहिल्या १२ अब्जाधीशांची यादी
१. बर्नार्ड अर्नॉल्ट – १८९ अब्ज डॉलर्स
२. एलोन मस्क – १६० अब्ज डॉलर्स
३. जेफ बेझॉस – १२५ अब्ज डॉलर्स
४. बिल गेट्स – १११ अब्ज डॉलर्स
५.वॉरेन बफेट – १०७ अब्ज डॉलर्स
६. लॅरी एलिसन – ९९.५ अब्ज डॉलर्स
७. लॅरी पेज ९० – अब्ज डॉलर्स
८. स्टीव्ह बाल्मर – ८६.९ अब्ज डॉलर्स
९. सेर्गी ब्रिन – ८६.४ अब्ज डॉलर्स
१०. कार्लोस स्लिम – ८५.७ अब्ज डॉलर्स
११. गौतम अदाणी – ८४.४ अब्ज डॉलर्स
१२. मुकेश अंबानी – ८२.२ अब्ज डॉलर्स