वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
भारतीय उद्योजक आणि अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्याविरोधात दाखल केलेले लाचखोऱी आणि भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याची अमेरिकेच्या न्याय विभागाची योजना असल्याची माहिती आहे. एका बैठकीत गौतम अदानींच्या वकिलांनी असामान्य प्रस्ताव ठेवल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती या घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी दिली. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
जो बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये अदानींविरोधात अमेरिकी करदात्यांचा पैसा वापरून लाचखोरी, भ्रष्टाचार आणि घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र, गेल्या काही आठवड्यांमधील घडामोडींनंतर हे आरोप मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अदानी यांचे नवे वकील रॉबर्ट जे. गिफ्रा यांनी गेल्या महिन्यात न्याय विभागाच्या अधिकार्यांबरोबर एक बैठक घेतली होती. त्या बैठकीचे वृत्त कुठेही प्रसिद्ध झाले नव्हते. या प्रकरणाशी संबंधित १०० स्लाइड त्यांनी सादर केल्या. तसेच अदानी यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे, तसेच अमेरिकी न्यायालयाच्या अखत्यारीत त्यांच्याविरोधात खटला येत नसल्याचे त्यांनी अधिकार्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, असे एका सूत्राने सांगितले.
ट्रम्प यांच्या वैयक्तिक वकिलांकडे धुरा
अदानी यांनी रॉबर्ट जे. गिफ्रा यांच्या नेतृत्वाखालील वकिलांचे नवे पथक नियुक्त केले आहे. रॉबर्ट जे. गिफ्रा हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक वकिलांपैकी एक आहेत. गिफ्रा यांनी न्याय विभागाच्या अधिकार्यांबरोबर झालेल्या बैठकीत अदानींवरील आरोप मागे घेतल्यास, अमेरिकेत १० अब्ज डॉलर गुंतवणुकीचा आणि १५ हजार रोजगारनिर्मितीचा प्रस्ताव ठेवला, अशी सूत्रांची माहिती आहे. ट्रम्प अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतरही अदानी यांनी असे आश्वासन दिले होते. मात्र, या गुंतवणुकीचा खटल्याशी काही संबंध नाही, असे वकिलांनी नंतर गिफ्रा यांना सांगितले. पण, किमान एका वरिष्ठ अधिकार्याला या प्रस्तावाबद्दल अनुकूल मत झाले, असे सूत्रांनी सांगितले.
