न्यूयॉर्क : उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांनी अमेरिकेच्या बाजार नियंत्रक असलेल्या ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’ने (एसईसी) बजावलेली कायदेशीर नोटीस स्वीकारण्याचे मान्य केले आहे. न्यूयॉर्कच्या ब्रुकलीन येथील न्यायालयात ‘एसईसी’ आणि अदानींच्या अमेरिकेतील वकिलांनी यासंबंधी माहिती दिली.

यापूर्वी भारताच्या कायदा आणि विधि मंत्रालयाने मे २०२५मध्ये आणि त्यानंतर डिसेंबर २०२५मध्ये अदानींना समन्स बजावण्यास नकार दिला होता. त्यामुळे मानक आंतरराष्ट्रीय सेवा प्रक्रियांना वळसा घालून ईमेलद्वारे अदानींना परिणामकारकतेने समन्स बजावण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती करत ‘एसईसी’ने न्यूयॉर्क फेडरल न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, आता अदानींनी नोटीस स्वीकारण्याचे मान्य केल्यामुळे नोटीस कशा प्रकारे बजावावी यासंबंधीचा निकाल देण्याची गरज उरलेली नाही.

‘एसईसी’ने अदानी यांच्यावर लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोप ठेवला आहे. अदानी यांना नोटिशीला उत्तर देण्यासाठी ९० दिवसांची मुदत मिळेल. त्यानंतर ‘एसईसी’ला ६० दिवसांत त्यावर उत्तर द्यावे लागेल. एसईसीच्या प्रत्युत्तराला पुन्हा उत्तर देण्यासाठी अदानींना पुढे ४५ दिवसांचा कालावधी मिळेल. ‘अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड’शी (एजीईएल) संबंधित खोटे आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन अमेरिकी कायद्याचा भंग केला असा आरोप करत ‘एसईसी’ने गौतम अदानी व सागर अदानी यांच्याविरोधात नोव्हेंबर २०२४मध्ये खटला दाखल केला आहे.