भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू गौतम गंभीर नेहमीच महत्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर आपलं मत मांडत असतो. नुकतंच त्याने महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली. एखाद्या दिवशी आपली मुलगी आपल्याला बलात्कार या शब्दाचा अर्थ तर विचारणार नाही ना..अशी भीती आपल्याला सतावत असल्याचं गंभीरने सांगितलं आहे. गौतम गंभीरने सांगितलं की, जेव्हा मी १४ वर्षांचा होतो तेव्हा मला पहिल्यांदा बलात्कार हा शब्द माहिती पडला होता.

गंभीरने सांगितलं की, १९८० मध्ये आलेला चित्रपट ‘इन्साफ के तराजू’ माझ्या जन्माच्या एक वर्षानंतर रिलीज झाला होता. मला आता नेमकं आठवत नाही की, हा चित्रपट मी दूरदर्शनवर पाहिला होता की, दुसरीकडे कुठे. पण हा चित्रपट दोन बलात्कार पीडितांवर आधारित होता एवढं लक्षात आहे. चित्रपटात राज बब्बर यांनी बलात्काऱ्याची भूमिका निभावली होती. जेव्हा पीडित आरोपीची हत्या करतात तेव्हाच त्यांना दिलासा मिळतो. आज लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना नेहमी समोर येत असतात. अशा परिस्थिती माझी मुलगी मला बलात्काराचा अर्थ तर विचारणार नाही ना अशी भीती सतावते.

दोन मुलींचा बाप असल्याचा मला आनंद आहे, पण थोडी भीतीदेखील आहे. आनंद या गोष्टीचा आहे की, शाळेत त्यांना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’बद्दल सांगितलं जातं, आणि भीती आहे कारण रोज बलात्कारासारख्या घटना घडत आहेत. यावेळी गंभीरने कठुआ, उन्नाव बलात्कार आणि इतर घटनांचा उल्लेख करताना हे अत्यंत लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे. हे लोक दहशतवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक असल्याचंही त्याने सांगितलं.