पूर्व दिल्ली मतदारसंघातील भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला कथित इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया (ISIS) काश्मीरच्या ईमेल आयडीवरून तिसरी धमकी मिळाली आहे. गौतम गंभीरला पाठवलेल्या मेलमध्ये दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता काहीही करू शकत नाहीत, दिल्ली पोलिसात आमचे गुप्हेतर हजर आहेत आणि आम्ही तुमच्याबद्दल सर्व माहिती घेत आहोत, असे म्हटले आहे.

पूर्व दिल्लीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला आठवडाभरात मिळालेली ही तिसरी धमकी आहे. याआधी गौतम आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्याही मेलद्वारे देण्यात आल्या होत्या.

२३ नोव्हेंबरच्या रात्री गौतम गंभीरला पहिला ईमेल आला, ज्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत गंभीरने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली होती. पण २४ तारखेला पुन्हा त्याला एक ईमेल आला, ज्यामध्ये ‘काल तुला मारायचे होते, पण वाचलास, काश्मीरपासून दूर राहा’ असे लिहिले होते. या मेलसोबत गंभीरच्या घराबाहेरचा एक व्हिडिओही पाठवण्यात आला होता. ही धमकी त्याला ISIS काश्मीरने दिल्याचा गंभीर आरोप आहे.

सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, isiskasmir@yahoo.com वरून सकाळी १.३७ वाजता ईमेल प्राप्त झाला. ईमेलमध्ये त्यांनी नमूद केले आहे की “दिल्ली पोलिस आणि आयपीएस श्वेता काहीही करू शकत नाहीत कारण त्यांचे गुप्तहेर सैन्यात उपस्थित आहेत.” 

गौतम गंभीरला धमकीचा मेल पाकिस्तानातून आल्याचे तपासत समोर आले आहे. गौतम गंभीरने आरोप केला होता की त्याला आयएसआयएस काश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पण ज्या सिस्टीमद्वारे हा मेल पाठवला गेला त्याचा आयपी अ‍ॅड्रेस पाकिस्तानमध्ये सापडला आहे. दिल्ली पोलिसांनी गुगलकडून माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला धमकीचा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता. पाकिस्तानचा आयपी अ‍ॅड्रेसही सापडला आहे.