हमास व इस्रायल यांच्यात गाझा दीर्घकालीन शस्त्रसंधी करार झाला असून त्यात इजिप्तने मध्यस्थी केली आहे, या वृत्ताला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दुजोरा दिलेला नाही, तसेच त्यावर काही प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी म्हटले आहे की, हमास व इस्रायल यांच्यातील शस्त्रसंधीचे आम्ही स्वागत करतो पण ती दीर्घकाळ टिकावी अशी आमची अपेक्षा आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी सांगितले की, हमास व इस्रायल यांच्यातील स्थायी शांततेत दोघांचेही हित आहे व आता या शस्त्रसंधी करारातून पुढे राजकीय तोडगा निघेल अशी आपल्याला आशा आहे. शस्त्रसंधीचा करार इजिप्तची राजधानी कैरो येथे झाला असे हमासचे प्रवक्ते सामी अबू झुहरी यांनी गाझा येथे सांगितले. पॅलेस्टाईनने म्हटले आहे की, गेले सात आठवडे चालू असलेला संघर्ष संपला असून शस्त्रसंधी जारी करण्यात येत आहे. गाझाचे इजिप्त व इस्रायलने रोखून ठेवलेल्या प्रवेशद्वारांना मोकळे केले जाईल, तसेच मच्छीमारीसाठी भूमध्यसमुद्रापर्यंत व्यापकता प्राप्त करून देण्यात आली आहे. गाझा सागरी बंदराची निर्मिती व व्याप्त पश्चिम किनारा भागातील हमासच्या कैद्यांची सुटका या मागण्या मान्य करण्यात आल्याचे समजते.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी वॉशिंग्टन येथे सांगितले की, इस्रायल व हमास यांच्यातील ही शस्त्रसंधी टिकून रहावी व शाश्वत शांतता निर्माण व्हावी. शस्त्रसंधी कराराला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. गाझामध्ये मानवतेच्या तत्त्वावर आधारित आवश्यक साधनसामुग्री पोहोचवण्यात यावी. पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी आमचा संपर्क आहे. या वाटाघाटीत इजिप्तने केलेली मध्यस्थी स्वागतार्ह आहे असेही ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार हमास व इस्रायल यांच्यातील संघर्षांत आठ आठवडय़ात २१०१ जण मारले गेले आहेत. त्यात अनेक नागरिक आहेत. इस्रायलचे ६७ जण मरण पावले आहेत.
‘हमासने गुडघे टेकायला लावले’
इस्त्रायल आणि हमास यांच्यात ५० दिवस चाललेल्या रक्तरंजित संघर्षांत शेवटी हमासच्या नेत्यांनी इस्त्रायलच्या सैन्याला गुडघे टेकायला लावले, ही चांगलीच गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया इराणने दिली. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, इस्त्रायलला धडा शिकवून हमास खरा विजेता ठरला आहे. यासाठी पॅलेस्टिीनी जनतेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. त्यांनी अभेद्य एकजूट दाखवून इस्त्रायला नेस्तनाबूत केले आहे.