देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालं. १९५८ मध्ये उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यातील सेंज गावात जन्मलेले जनरल बिपिन रावत हे लष्करी अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील होते. त्यांचे वडील लक्ष्मण सिंह रावत लष्करात लेफ्टनंट जनरल म्हणून निवृत्त झाले होते. सैंज हे गाव उंचीवर वसलेले असून जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४२ किमी आणि यमकेश्वरपासून ४ किमी अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार सैंजमध्ये २१ कुटुंबे राहत होती आणि गावची लोकसंख्या ९३ होती. गावातील बहुतेक लोक आता या छोट्याशा गावातून स्थलांतरित झाले आहेत.

बिपिन रावत हे त्यांच्या मूळ गावी जास्त काळ राहिलेले नाही. ते लहान वयातच शालेय शिक्षणासाठी डेहराडूनला निघून गेले. बिपिन रावत यांनी डेहराडूनमधील कॅंब्रियन हिल स्कूल आणि त्यानंतर शिमल्याच्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर ते खडकवासला, पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये दाखल झाले.

यमकेश्वरच्या आमदार रितू खंडुरी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “उशीरा का होईना सीडीएस रावत यांच्यामुळे पौरी गढवालला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. काही वर्षांपूर्वी रावत यांनी जिल्ह्याचा दौरा केला होता, तेव्हा त्यांनी उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना त्यांच्या गावापर्यंत चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी रस्ता बांधण्याची विनंती केली होती.”

“सैंज गावात रावत यांच्या जवळच्या कुटुंबातील कोणीही राहत नाही. पण काही वर्षांपूर्वी त्यांनी गावाला भेट दिली आणि गावाला इतर गावांशी जोडणारा रस्ता बांधण्याची मागणी केली. त्यानंतर, आम्ही सुमारे साडेचार किमी लांबीचा रस्ता तयार करण्यास सुरुवात केली. यापैकी साडेतीन किमीचा रस्ता बांधून पूर्ण झाला असून जमिनीशी संबंधित काही वाद असल्याने उर्वरित रस्ता बांधण्यास वेळ लागला,” असेही खंडुरी यांनी सांगितले.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालं. बुधवारी दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचे एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं देखील निधन झालंय.

हेही वाचा – “हेलिकॉप्टर अपघातानंतरही सीडीएस रावत जिवंत होते, त्यांनी हळू आवाजात नाव सांगितले”; अग्निशमन कर्मचाऱ्याचा दावा

हेही वाचा – बिपीन रावतांसह १३ जणांचा मृत्यू; तमिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; देशभर हळहळ

हेही वाचा – जनरल रावत : भारतीय लष्कराच्या फेरसंघटन मोहिमेचे पहिले सेनापती