नवी दिल्ली : जंतर-मंतरच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्या ‘जेन-झी’वर केंद्र सरकारने कारवाई सुरू केली आहे. पंतप्रधानांचे प्रतिमाहनन करणाऱ्यांविरोधात तडजोड केली जाणार नसल्याचे संकेत या कारवाईतून देण्यात आले आहेत. मात्र, विद्यार्थी आंदोलकांचा पोलिसांनी छळ सुरूच ठेवला तर शांततेच्या मार्गाने पुन्हा मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजत दिपके यांनी दिला आहे.

फरिदाबादस्थित तरुणी रुचिका सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संविधानपदावर बसलेल्या व्यक्तीविरोधात निंदनीय मजकूर लिहिणे, जाणीवपूर्वक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे अशी कारणे गुन्हा नोंदवताना देण्यात आली आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या तरुण आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घेण्यात येणार असले तरी, समाजमाध्यमांवरून पंतप्रधान वा अन्य संविधानिक पदावरील व्यक्तींवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या ‘जेन-झी’बाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारच्या या भूमिकेला ‘सीजेपी’ तसेच, काँग्रेसने विरोध केला आहे. रुचिका सिंह यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणे योग्य नाही. केवळ अपमानास्पद भाषा वापरणे हा स्वतःहून फौजदारी गुन्हा ठरत नाही. लोकसभेतील सुमारे ५० टक्के खासदारांवर फौजदारी खटले दाखल झालेले आहेत, त्यामध्ये भाजपच्या सुमारे १०० खासदारांचाही समावेश आहे. पोलिसांनी आपली ताकद या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या खासदारांच्या खटल्यांवर केंद्रित केली पाहिजे. २५ वर्षीय महिलेला लक्ष्य करण्यावर त्यांनी ताकद वाया घालवू नये. तरुणांचा छळ तात्काळ थांबला पाहिजे, असे प्रत्युत्तर ‘सीजेपी’चे राष्ट्रीय प्रवक्ते सौरव दास यांनी दिले आहे.

रुचिका यांनी वापरलेली भाषा योग्य होती असे नव्हे. ती कोणाला आक्षेपार्ह वाटू शकते. पण, त्यासाठी फौजदारी कारवाई करणे हा मार्ग नव्हे. त्यांच्या विरोधात दिवाणी खटलाही चालवता येऊ शकतो. ते न करता आंदोलकांविरोधात फौजदारी कारवाई केली जात आहे. त्यातून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचे दिसते. – सौरव दास, राष्ट्रीय प्रवक्ते, ‘सीजेपी’

राहुल गांधी यांचा इशारा

तरुण आंदोलकांविरोधात केलेल्या कारवाईचा काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निषेध केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जेन-झी’शी सांभाळून वागावे असा सल्ला दिला आहे. “पंतप्रधान मोदी आणि अमित शाह, तुम्ही जेन-झीला धमकावून गप्प करू शकत नाही. आधी तुम्ही त्यांची हाडे मोडलीत. आता तुम्ही त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करत आहात आणि त्यांची समाजमाध्यमांवरील खाती बंद करत आहात. तुम्ही भारताचा ‘भूतकाळ’ आहात, भारताच्या ‘भविष्या’शी वागताना सावध राहा,” असे राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.