दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर आता सामाजिक पातळीवरील उपाय म्हणून शालेय अभ्यासक्रमातच लैंगिक संवेदनशीलता हा विषय समाविष्ट केला जाणार असून, त्यात महिलांचा आदर करण्यास मूल्यशिक्षणांतर्गत शिकवले जाणार आहे. तो अभ्यासक्रमाचा भाग असलाच पाहिजे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री पल्लम राजू यांनी एका कार्यक्रमासाठी येथे आले असताना व्यक्त केले आहे.
शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचा तो भाग असायला हवा असे सांगून ते म्हणाले, की त्यावर एनसीइआरटी, यूजीसी, राष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळ यांच्या अध्यक्षांशी आपण चर्चा करू. लैंगिक संवेदनशीलता व स्त्रियांचा आदर, शिष्टाचार, संस्कृती या बाबी मानवी जीवनात महत्त्वाच्या आहेत, मूल्यांची जोपासना करणे त्यासाठी आवश्यक आहे.
राजू म्हणाले, की यूजीसीच्या अध्यक्ष व शिक्षण मंत्रालयाला आपण शाळा व महाविद्यालयांच्या आवारात स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्यांना कडक शिक्षेच्या तरतुदी समाविष्ट करण्यास सांगितले आहे.