तामिळनाडूमध्ये संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळून त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नक्की काय घडलं याबद्दलचं चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. अशातच आता ही घटना प्रत्यक्ष पाहिलेली व्यक्ती समोर आली असून त्या व्यक्तीने यासंदर्भात दिलेली माहिती कदाचित महत्त्वाची ठरू शकेल.
ही दुर्घटना ज्याने प्रत्यक्ष पाहिली त्या व्यक्तीने सांगितलं की, या दुर्घटनेनंतर काही काळ जनरल जिवंत होतं. हेलिकॉप्टर कोसळलं तेव्हा शिव कुमार हे कंत्राटदार आपल्या भावाची भेट घेण्यासाठी चालले होते. त्यांनी सांगितलं की आपण वायूसेनेचं हे आग लागलेलं हेलिकॉप्टर कोसळताना पाहिलं आणि त्यांच्यासह सोबतचे काही जण लगेचच घटनास्थळी पळत गेले.शिव कुमार म्हणाले, आम्ही तीन व्यक्ती खाली पडताना पाहिल्या. त्यातली एक व्यक्ती जिवंत होती. ती व्यक्ती सतत पाणी मागत होती. आम्ही त्यांना बेडशीटमध्ये घालून बाहेर ओढलं आणि बचावकार्य करणाऱ्यांकडे सोपवलं. पण तीन तासांनंतर मला कळलं की, ज्या माणसाने माझ्याकडे पाणी मागितलं तो माणूस म्हणजे जनरल बिपिन रावत होते.मला विश्वासच बसत नव्हता. या व्यक्तीने देशासाठी एवढं काही केलं आहे आणि मी त्याला साधं पाणीही देऊ शकलो नाही. या विचाराने मी रात्रभर झोपू शकलो नाही.




ही घटना सांगत असताना शिव कुमार यांना अश्रू अनावर झाले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितलं की या दुर्घटनेविषयी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जनरल रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर ११ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेतून वाचलेली एकमेव व्यक्ती म्हणजे गृप कॅप्टन वरुण सिंह. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. या आगीत वरुण सिंह ४५ टक्के भाजले गेले असून त्यांना सध्या लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.