पीटीआय, लखनऊ

राममंदिराची उभारणी आणि हेतूपूर्वक केलेला धार्मिक प्रचार या जोरावर उत्तर प्रदेशात गतवेळच्या ६२पेक्षाही अधिक जागा जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला राज्याच्या मतदारांनी जोरदार हादरा दिला. लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या या राज्यातील सर्वच प्रादेशिक पट्ट्यांमध्ये भाजपला फटका बसल्याने पक्षाच्या विजयी जागांची संख्या थेट निम्म्यावर आली. राममंदिराचा मुद्दा प्रचारात अग्रस्थानी ठेवणाऱ्या भाजपला राममंदिर असलेल्या अयोध्येतच पराभवाचे तोंड पाहावे लागले.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा असून त्यापैकी पश्चिम उत्तर प्रदेशात १०, ब्रजमध्ये ८, अवधमध्ये २०, रोहिलखंडमध्ये ११, बुंदेलखंडमध्ये ५ आणि पूर्वांचलमध्ये २६ जागा आहेत. २०१९च्या निवडणुकीत यापैकी ६२ जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदा नरेंद्र मोदींची लोकप्रियता, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींची राज्यावरील पकड आणि श्रीराम मंदिराची उभाणी या जोरावर या जागांमध्ये वाढ होण्याची भाजपला अपेक्षा होती. संपूर्ण प्रचारादरम्यान भाजपने ‘रामभक्त’ विरुद्ध ‘रामद्रोही’ या मुद्द्यांवर भर दिला. मोदींच्या अनेक सभा आणि रोड शोही घेण्यात आले. मात्र, त्याचा फायदा होण्याऐवजी भाजपच्या जागांत घट होऊन त्या ३३ वर आल्या.समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या घट्ट आघाडीने केलेल्या जोरदार प्रचाराच्या जोरावर या दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली.

हेही वाचा >>>दक्षिण दिग्विजयाचे स्वप्न अधुरेच; तमिळनाडूत भोपळा फोडण्यातही भाजपला अपयश

भाजपच्या पराभवाचे विश्लेषण अद्याप करण्यात येत असले तरी, उत्तर प्रदेशच्या सर्वच भागांत झालेली घट पक्षासाठी चिंताजनक आहे. स्मृती इराणी आणि मनेका गांधी या दोन मोठ्या नेत्यांना अनुक्रमे अमेठी आणि सुल्तानपूर येथून पराभव स्वीकारावा लागला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळापासूनची जागा असलेल्या लखनऊमध्ये राजनाथ सिंह यांचे मताधिक्य कमालीचे घटले.

२०१९मध्ये येथून ३.४७ लाख मताधिक्याने विजयी झालेले राजनाथ यांना यंदा दीड लाखांचेच मताधिक्य मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही मताधिक्यात झालेली घट पक्षासाठी धक्कादायक आहे.

बिहार : शेवटच्या टप्प्याचा ‘इंडिया’ला हात

बिहारमध्ये रालोआने ४० पैकी ३० जागा जिंकल्या असल्या तरी भाजपची गेल्या काही निवडणुकांतील ही सर्वांत खराब कामगिरी आहे. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात ‘इंडिया’ने मुसंडी मारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अखेरच्या टप्प्यात राज्यात आठ जागांवर मतदान झाले.

गुजरात : २०१९च्या तुलनेत भाजपला नुकसान

काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपला काहीसे नुकसान सहन करावे लागले आहे. २६पैकी २५ जागा मिळविताना भाजपने केवळ एक जागा गमावली असली, तरी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पक्षाची मते १.२५ टक्क्यांनी घटून ६१.८६ टक्क्यांवर गेली आहेत. ‘इंडिया’ आघाडीतील काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला एकत्रितरीत्या ३३.९३ टक्के मते आहेत. २०१९मध्ये काँग्रेसला ३२.५५ टक्के मते होती. मात्र ‘आप’बरोबर आघाडी असतानाही पक्षाची मते या वेळी ३१.२४ टक्क्यांपर्यंत खाली आली. काँग्रेसला बनासकाठा मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या लढतीत विजय मिळाला. सर्व २६ जागा लढलेल्या बहुजन समाज पार्टीला ०.७६ टक्के मतांवर समाधान मानावे लागले आहे.

आसाम : भाजप, काँग्रेसच्या मतटक्क्यांत वाढ

गुवाहाटी : आसाममध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख राजकीय विरोधकांच्या मतटक्क्यांत वाढ झाल्याचे चित्र आहे. भाजपने १४ पैकी ९ जागा जिंकल्या असून पक्षाची मते ३६.४१वरून २७.४३ टक्क्यांवर गेली आहेत. तीन जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचा टक्का १.६९ने वाढून ३७.४८वर गेला आहे. रालोआचा घटक असलेल्या आसाम गण परिषदेने तीन जागा जिंकल्या असून १० वर्षांत प्रथमच पक्षाला लोकसभेला यश मिळाले आहे. मात्र या पक्षाच्या मतांच्या टक्केवारी ८.३१वरून ६.४६ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. रालोआचा दुसरा घटकपक्ष यूपीपीएसने एक जागा जिंकली आहे. मात्र एआययूडीएफ, आप, तृणमूल या अन्य पक्षांना आसाममध्ये खाते उघडता आलेले नाही.

मध्य प्रदेश : भाजप, ‘नोटा’च्या मतटक्क्यात वाढ

भोपाळ : २९ पैकी २९ जागा भाजपला देणाऱ्या मध्य प्रदेशात काँग्रेसची मते (३२.४४ टक्के) दोन टक्क्यांनी घटली आहेत. यातील निम्मी मते भाजपकडे आली असून त्या पक्षाचा मतटक्का सुमारे सव्वा टक्क्याने वाढून ५९.२८वर गेला आहे. विशेष म्हणजे, राज्यात ‘वरीलपैकी कुणीही नाही’ (नोटा) हा पर्याय तब्बल ५ लाख ३३ हजार ७०५ मतदारांनी स्वीकारला आहे. एकट्या इंदूरमध्ये २ लाख १८ हजार ६७४ मते ‘नोटा’ला मिळाली आहेत. काँग्रेस उमेदवाराने ऐन वेळी माघार घेतल्यानंतर पक्षाने आपल्या मतदारांना ‘नोटा’चे बटण दाबण्याचे आवाहन केले होते. परिणामी या पर्यायाचा मतटक्का ०.९२ने वाढून १.४०वर गेला आहे. दुसरीकडे देशात एकही जागा न जिंकणाऱ्या बहुजन समाज पार्टीची मध्य प्रदेशातील मते एक टक्क्याने वाढली आहेत. इंदूरमध्ये शंकर ललवानी ११.७५ लाख मतांनी तर विदिशामध्ये माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ८.२१ लाख मतांनी निवडून आले आहेत.

उत्तराखंड : काँग्रेसला दिग्गजांची अनुपस्थिती भोवली

डेहराडून : उत्तराखंडमध्ये सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपने पाचपैकी पाच जागांवर विजय मिळविला. मात्र याला भाजपच्या लोकप्रियतेपेक्षा काँग्रेसच्या दिग्गजांची अनुपस्थिती अधिक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हरिद्वारमध्ये माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे पुत्र वीरेंद्र यांना काँग्रेसने तिकीट दिले. या मतदारसंघात २०१४ पासून सातत्याने काँग्रेसचा मतटक्का वाढत असून भाजपचा कमी होत आहे. अशा वेळी हरीश रावत स्वत: लढले असते, तर चित्र वेगळे राहिले असते. अन्य चार मतदारसंघांतही कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती होती. राज्यातील ज्येष्ठ नेते निवडणुकीपासून लांब राहिल्याने कार्यकर्तेही संभ्रमात असल्याचे चित्र होते.

उत्तर प्रदेशमधील निकाल

● पश्चिम उत्तर प्रदेशात गतवेळी सहा जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा चारच जागा.- अवघमधील २० जागांपैकी अवघ्या नऊ जागांवर विजय. राम मंदिर असलेल्या फैजाबादमध्येही पराभव.

● रोहिलखंडमधील ११ पैकी चारच जागांवर विजय. गतवेळेपेक्षा पाच जागांची घट

● बुंदेलखडमध्ये गतवेळेस पाचही जागा जिंकणाऱ्या भाजपचा यंदा एकाच जागेवर विजय.

● पूर्वांचलमधील २६पैकी दहाच जागा ताब्यात. गतवेळच्या तुलनेत आठ जागांची घट.

● ब्रजमधील आठपैकी पाच जागांवर विजय.