लोकसत्ता विशेष प्रतीनिधी

नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकाच्या प्रती वितरित झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. मात्र, मंगळवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या “नरवणेंवर विश्वास ठेवणार की, प्रकाशक ‘पेग्विन-रँडम हाऊस’वर,” या विधानानंतर पेग्विन-इंडिया आणि जनरल नरवणे यांनीही स्पष्टीकरण दिले.

जनरल नरवणेंचे हे वादात सापडलेले पुस्तक भारतात प्रकाशित झालेले नाही, असा दावा ‘पेग्विन इंडिया’ने केल्यानंतर, पुस्तक स्वरुपात वा डिजिटल स्वरुपामध्ये त्याच्या प्रती वितरित कशा झाल्या याचा तपास दिल्ली पोलिस करत आहे. या प्रकरणी पेग्विन प्रकाशनाला दोन दिवसांत दोन स्पष्टीकरणे ‘एक्स’वरून प्रसिद्ध करावी लागली आहेत. सोमवारी संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये पेग्विनने ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे पुस्तक कुठल्याही स्वरुपात प्रकाशित झाले नसल्याचा दावा केला. हे निवेदन जनरल नरवणे यांनी ‘एक्स’वर पुन्हा प्रसिद्ध करून ‘पेग्विन-रँडम हाऊस’च्या भूमिकेला एकप्रकारे दुजोरा दिला.

मात्र, राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेच्या आवारात पेग्विनचा दावा फेटाळला. त्यासाठी त्यांनी जनरल नरवणे यांचे या पुस्तकासंदर्भात १५ डिसेंबर २०२३ मध्ये केलेले ‘एक्स’वरील निवेदन दाखवले. ‘पेग्विन इंडिया’ने ‘प्री-ऑर्डर नाऊ’ या मजकुरासह जनरल नरवणे व त्यांच्या पुस्तकाचे छायाचित्र असलेले टिपण ‘एक्स’वर प्रसिद्ध केले होते. त्याला नरवणे यांनी ‘एक्स’वर पुन्हा प्रसिद्धी दिली होती. ‘एक्स’वरील ते टिपण दाखवून राहुल गांधी यांनी नरवणेंवर विश्वास ठेवणार की, पेग्विनने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या निवेदनावर, असा सवाल केला. “नरवणे खोटे बोलत आहेत असे मला वाटत नाही. पेग्विनने हे पुस्तक प्रकाशित झाले नसल्याचा दावा केला असला तरी, ऑनलाइन हे पुस्तक उपलब्ध आहे, त्यामुळे पेग्विनचा हे पुस्तक प्रकाशित झाले नसल्याचे स्पष्टीकरण फोल ठरते,” असाही दावा राहुल गांधींनी केला. राहुल गांधींच्या या दाव्यामुळे पुस्तकाच्या प्रकाशनावरून सुरू झालेल्या वादात मंगळवारी आणखी भर पडली.

संसदेच्या आवारातून राहुल गांधींनी थेट ‘पेग्विन इंडिया’लाच लक्ष्य केल्यामुळे या प्रकाशकाला मंगळवारी पुन्हा एकदा ‘एक्स’वरून स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यामध्ये एखादे पुस्तक प्रकाशित झाले असे अधिकृतपणे कधी मानता येते याचे भलेमोठे स्पष्टीकरण दिले.

पेंग्विनचा खुलासा

“घोषित पुस्तक, प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असलेले पुस्तक आणि प्रकाशित पुस्तक ही एकच बाब नव्हे. १ ) पुस्तकाची घोषणा: पुस्तक नियोजित आहे, ते अद्याप प्रकाशित झालेले नाही किंवा विक्रीसाठी उपलब्ध नाही. २) पुस्तक प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध प्री-ऑर्डर ही एक नियमित प्रकाशन पद्धत आहे. ती वाचकांना आणि किरकोळ विक्रेत्यांना आगाऊ ऑर्डर देण्याची परवानगी देते. पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही किंवा उपलब्ध नाही. ३) भविष्यातील तारखेसाठी अनुसूचित पुस्तक: नियोजित प्रकाशन तारीख म्हणजे पुस्तक प्रकाशनासाठी नियोजित आहे. याचा अर्थ असा नाही की पुस्तक प्रकाशित झाले आहे. ४) प्रकाशित पुस्तक: पुस्तक किरकोळ विक्रेत्यांकडे (दुकानात) खरेदीसाठी उपलब्ध असेल तरच ते प्रकाशित झालेले असते.”

‘ही पुस्तकाची सद्यस्थिती’

‘पेग्विन इंडिया’ने मंगळवारी ‘एक्स’वर प्रसिद्ध केलेले निवेदन जनरल नरवणे यांनी पुन्हा प्रसिध्द केले असून ‘ही पुस्तकाची सद्यस्थिती आहे,’ अशी टिप्पणी केली. त्यातून त्यांनी पुस्तकाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या संपूर्ण वादावर अप्रत्यक्षपणे स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. जनरल नरवणेंच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ यांच्या पुस्तकामध्ये चिनी घुसखोरीसंदर्भात मतप्रदर्शन केले असल्याचा दावा राहुल गांधींनी लोकसभेत केला होता. या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वगुणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा दावाही राहुल गांधींनी केला. या पुस्तकातील मजकूर लोकसभेत वाचून दाखवण्याला राजनाथ सिंह यांनी विरोध केला होता. त्यानंतर राहुल गांधींनी या पुस्तकाची प्रत संसदेच्या आवारात पत्रकारांना दाखवत हे पुस्तक उपलब्ध असल्याचा दावा केला होता. या पुस्तकाची पीडीएफ स्वरुपातील प्रत डिजिटल माध्यमांवर उपलब्ध असल्याचे आढळल्यानंतर“पेग्विन इंडिया’ने अशा प्रती जप्त केल्या पाहिजेत, असे निवेदन सोमवारी ‘एक्स’वर केले होते.