नवी दिल्ली : “आपल्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकातील भाग उद्धृत करणे आणि आपल्याला वादात ओढणे अनावश्यक होते,” असे मत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी अलीकडेच व्यक्त केले. दिल्लीमध्ये ‘द क्युरियस अँड द क्लासिफाईड – अनर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्टरीज’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना यावरून उद्भवलेल्या वादावर भाष्य केले. “त्या पुस्तकात नमूद केलेल्या घडामोडींपासून आपण बरेच पुढे आलो आहोत, आपली दोन पुस्तके लिहून झाली आहेत आणि तिसरे लवकरच प्रकाशित होईल,” असे जनरल नरवणे म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फेब्रुवारीमध्ये संसदेच्या अधिवेशनात जनरल नरवणे यांनी लिहिलेल्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकातील काही भाग वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये जनरल नरवणे यांनी २०२०मध्ये चीनशी झालेल्या संघर्षादरम्यान काही घटनाक्रमाचा उल्लेख केला आहे. मात्र, ते पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नसल्याचे सांगत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल यांना अडवले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता.
