माजी लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी Four Stars Of Destiny हे आत्मचरित्र लिहिलं आहे. हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही. दरम्यान या पुस्तकातल्या उल्लेखांच्या वाचनाच्या मुद्द्यावर लोकसभेत बराच गदारोळ झाल्याचं पाहण्यास मिळालं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. दरम्यान एम. एम. नरवणे यांचं पुस्तक प्रकाशित होऊ दिलं जात नाहीये असाही आरोप राहुल गांधींनी केला.
लोकसभेत काय घडलं?
राहुल गांधींकडून सेवानिवृत्त जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न झाला, तर पुस्तक प्रकाशित झालेले नाही त्यामुळे संदर्भ देता येत नाही, मंत्री राजनाथ सिंह यांनी आक्षेप घेतला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही जनरल नरवणे यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं नाही असं अमित शाह यांनीही म्हटलं आहे. राहुल गांधींकडून भारत चीन सीमेवर झालेल्या संघर्षाच्या अनुषंगाने मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आक्षेप घेतला. पुस्तक प्रकाशित झालं आहे की नाही ते राहुल गांधींनी सांगावं अशी मागणी लोकसभेत करण्यात आली ज्यावरुन गदारोळ झाला.
पेंग्विन इंडिया कंपनी आहे पुस्तकाची प्रकाशक
पेंग्विन इंडियाने या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी घेतली आहे. मात्र या पुस्तकाशी संबंधित प्रश्न हे फक्त राजकीय नाहीत. लष्करी अधिकारी आणि प्रमुख असलेल्या नरवणेंनी या पुस्तकात त्यांचे अनुभव लिहिले आहेत. आज जो गदारोळ झाला त्यामुळे हे पुस्तक पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. रिटायर्ड मेजर जनरल पी.के. सहगल यांच्याशी जनसत्ताने संवाद साधला तेव्हहा ते म्हणाले, “नरवणे यांच्या पुस्तकात काय उल्लेख केला आहे? काय लिहिलं आहे ते मला माहीत नाही. मात्र पुस्तकाचे काही अंश लिक झाले आहेत. आता सत्य काय आहे ते लोकांना समजलं पाहिजे. सरकारने हे पुस्तक छापण्याची संमती देऊन सत्य समोर आणलं पाहिजे.”
Four Stars of Destiny ला मंजुरी नाही
Four Stars Of Destiny ला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिलेली नाही. याबाबत विचारलं असता सहगल म्हणाले, “जनरल नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकाचा उल्लेख भाषणांमध्येही केला आहे. सरकारने हे पुस्तक छापण्यास संमती दिली पाहिजे. याआधीही माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या पुस्तकांना संमती मिळाली आहे, ती पुस्तकं प्रकाशितही झाली आहेत.”
भारत झुकला नाही हे वास्तव आहे असंही सहगल यांनी म्हटलं आहे
सहगल म्हणाले, डोकलामचा वाद २०१७ मध्ये झाला होता. या गोष्टीला आता ९ वर्षे उलटली आहेत. सरकारने घाबरण्याची गरज नाही. राहुल गांधींनी लोकसभेत सांगितलं की कैलास रिज पर्यंत चीनचे टँक आले होते, डोकलाममध्येही पोहचले होते. मात्र सरकारने त्यांच्यासमोर गुडघे टेकले नाहीत ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे. चीनने स्पष्टपणे सांगितलं होतं की तुमची अवस्था १९६२ पेक्षा वाईट होईल. मात्र सरकारने त्यांना ठामपणे उत्तर दिलं आम्ही सगळ्या प्रकारे उत्तर देण्यास तयार आहोत. आम्हाला युद्ध नको आहे, शांतता हवी आहे. पण तुम्ही जर युद्ध सुरु केलं आणि आम्हाला युद्ध करावं लागलं तर त्याचे परिणाम गंभीर होतील. त्यावेळी चीनचे सैनिकही मागे हटले नाहीत आणि भारताचे सैनिकही नाहीत. कैलास पर्वतांचा जो उल्लेख केला त्याबाबत मी इचकंच सांगेन की भारताचं पारडं चीनच्या तुलनेत जड होतं. त्यामुळे मला वाटतं की हे पुस्तक छापण्यास सरकारने संमती दिली पाहिजे.

