भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा यांची अमेरिकेची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी जनरल मोटर्सच्या मुख्य वित्त अधिकारीपदी (सीएफओ) नियुक्ती करण्यात आली आहे. ३९ वर्षीय सूर्यदेवरा सध्या जनरल मोटर्समध्ये कॉर्पोरेट फायनान्स उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्या एक सप्टेंबरपासून सीएफओ पदाचा कार्यभार स्वीकारतील.

मुळच्या चेन्नई येथील असणाऱ्या सूर्यदेवरा या जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मेरी बारा यांना रिर्पोट करतील. मेरी बारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या यांना वेगवेगळ्या पदावर काम करण्याचा अनुभव असून त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध केलेले आहे. त्यांच्या अनुभवाचा कंपनीला मोठा फायदा मिळाला आहे.

मेरी बारा या २०१४ पासून कंपनीच्या सीईओ असून ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. दोन प्रमुख पदांवर महिला कार्यरत असलेली जनरल मोटर्स ही पहिली कंपनी बनली आहे.

दिव्या सूर्यदेवरा यांनी मद्रास विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए करून अमेरिका गाठली. २००५ मध्ये म्हणजे वयाच्या २५ व्या वर्षी त्या जनरल मोटर्सशी जोडल्या गेल्या. तत्पूर्वी त्या यूबीएस आणि प्राइस वॉटर हाऊस कूपर्समध्ये काम केले होते. त्यांनी जनरल मोटर्सचे अनेक महत्वाचे व्यवहार चांगल्या पद्धतीने हाताळले होते. यामध्ये युरोपियन कंपनी ओपलची स्वंयचलित वाहन स्टार्टअप क्रूझ खरेदीच्या व्यवहाराचाही समावेश आहे. वर्ष २०१६ मध्ये त्यांना ऑटोमोटिव्ह न्यूज रायजिंग स्टारसाठी नामांकित करण्यात आले होते.