Ex-Army Chief Manoj Naravane clarifies his statement: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकावरून फेब्रुवारी २०२६ मध्ये बराच वाद उद्भवला होता. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाची प्रत सभागृहात आणून त्यातील काही ओळी उद्धृत केल्या होत्या. चीनच्या घुसखोरीसंदर्भात नरवणे यांनी पुस्तकात लिहिलेल्या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली होती. आता खुद्द नरवणे यांनी आक्षेप असलेल्या मजकुराबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
‘जो उचित समझे वो करो’
२०२० साली भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकात होता. पूर्व लडाखमधील भागात चिनी रणगाडे भारतीय चौक्यांच्या अगदी जवळ आले होते. अत्यंत तणावाच्या क्षणी भारतीय राजकीय नेतृत्वाकडून (पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री) स्पष्ट आदेश मिळण्यास विलंब झाला आणि शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार लष्करावरच सोपवण्यात आल्याचे पुस्तकात नमूद होते, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता.
संरक्षण मंत्री आपल्याला ‘जो उचित समझे वो करो’, असे म्हणाल्याचे विधान पुस्तकात होते. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना लक्ष्य करत त्यांनी लष्करप्रमुखांना एकटे सोडल्याचा आरोप केला होता.
मनोज नरवणे काय म्हणाले?
इंडिया टुडेला दिलेल्या ताज्या मुलाखतीमध्ये आता जनरल नरवणे यांनी त्या विधानावर भाष्य केले आहे. नरवणे म्हणाले, या विधानातून सरकारचा सशस्त्र दलावर असलेला पूर्ण विश्वास दिसून येतो. यावर कोणतेही राजकारण होणे चुकीचे आहे. नरवणे पुढे म्हणाले की, प्रत्यक्ष सीमेवरील परिस्थितीला तोंड देण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. “जो उचित समझे वो करो”, याचा अर्थ सरकारचा लष्करावर पूर्णपणे विश्वास होता.

लष्करासंबंधी राजकारण करण्यापासून सावधगिरी बाळगा, असा इशाराही नरवणे यांनी दिला. “सशस्त्र दल हे अराजकीय आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांसारखे ते नाही”, असे विधान करत नरवणे यांनी पाकिस्तानवरही अप्रत्यक्ष टीका केली. पाकिस्तानमध्ये लष्कराचे सरकारवर वर्चस्व असते आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारवरही ते अंकुश ठेवतात.
नेमका वाद काय होता?
जनरल मनोज नरवणे यांनी आत्मचरित्रात त्यांच्या ४० वर्षांच्या लष्करी सेवेचा अनुभव मांडला. जानेवारी २०२४ मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. मात्र, त्यातील दोन प्रमुख विषयांवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला. डिसेंबर २०२३ मध्ये पीटीआय वृत्तसंस्थेने त्यातील काही उतारे प्रसिद्ध केल्यानंतर भारतीय लष्कराने या पुस्तकाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला.
लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून नरवणे यांच्या पुस्तकातील कथित वादग्रस्त मजकूराची छाननी केली जात आहे. भारतीय संरक्षण दलाच्या नियमांनुसार, लष्करी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्वरुपात सेवेशी संबंधित बाबी प्रसारमाध्यमांना देण्यास मनाई आहे. तसेच, केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेता अशा स्वरूपाचे पुस्तक किंवा कोणताही दस्तऐवज प्रकाशित करण्यासही बंदी आहे.
आता मी पुढे गेलो आहे….
जनरल मनोज नरवणे यांनी प्रत्येक वर्षी नवे पुस्तक लिहिण्याचा ध्यास घेतला आहे. नुकतेच त्यांचे ‘द क्यूरियस अँड द क्लासिफाइड’ या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. प्रकाशनापूर्वी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधत असताना नरवणे म्हणाले की, आत्मचरित्राच्या वादातून मी आता पुढे गेलो आहे. यापुढे दरवर्षी एक पुस्तक लिहिण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ही पुस्तके कथा आणि कांदबरी स्वरुपातील असतील.
कोण आहेत मनोज नरवणे?
माजी लष्करप्रमुख राहिलेले जनरल मनोज मुकुंद नरवणे हे हवाई दलातील माजी अधिकाऱ्याचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९६० रोजी पुण्यात झाला होता. नरवणे यांनी पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहरादून येथे शिक्षण घेतले. तसेच त्यांनी डिफेन्स स्टडीजमध्ये एम.फिल. पदवीदेखील मिळवली.
जून १९८० मध्ये नरवणे यांची शीख लाइट इन्फंट्रीच्या ७ व्या बटालियनमध्ये नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय रायफल्सच्या सेकंड बटालियनचे (SikhLi) आणि १०६ इन्फंट्री ब्रिगेडचे नेतृत्व केले. तसेच नरवणे यांनी आसाम रायफल्सचे नेतृत्व करण्याबरोबरच काश्मीर आणि ईशान्य भारतातील अनेक कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
१६ डिसेंबर २०१९ मध्ये जनरल जनरल रावत यांच्यानंतर लष्करप्रमुख पदासाठी नरवणे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते आणि लष्करप्रमुख या पदावरून नरवणे एप्रिल २०२२ मध्ये निवृत्त झाले.
