सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ गंभीर, तर काही व्हिडीओ गमतीशीर असतात. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओची मोठी चर्चा सुरू आहे. हा व्हिडीओ आहे एका जर्मन राजनैतिक अधिकाऱ्याचा. या जर्मन राजनैतिक अधिकाऱ्याने भारतातील एका शेतकऱ्याच्या जनावरांच्या गोठ्यात काम करत भारतीय शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं? याचा अनुभव घेतला आहे.

जर्मन दूतावासातील राजनैतिक अधिकारी मारियस ओसवाल्ड (Marius Osswald) यांनी अलीकडेच भारतातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याचं जीवन अनुभवलं आहे. ते नवी दिल्लीतून थेट एका गावात पोहोचले आणि तेथे त्यांची भेट प्रमोद शर्मा नावाच्या शेतकऱ्याशी झाली. या ठिकाणी मारियस यांनी थेट जनावरांच्या गोठ्यात जाऊन जनावरांना चारा भरवला आणि गोठ्यातील शेण उचललं व दुग्धव्यवसायातील बारकावे समजून घेतले.

दरम्यान, मारियस ओसवाल्ड हे नवी दिल्लीतील जर्मन दूतावासातील एक प्रमुख राजनैतिक अधिकारी आहेत. आता त्यांच्या या साधेपणाचं नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे. तसेच मारियस ओसवाल्ड यांचा हा व्हिडीओ जर्मन दूतावासाच्या अधिकृत @germanynindia या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?

मारियस ओसवाल्ड यांनी जेव्हा शेतकऱ्याच्या गोठ्यात काम केलं, तेव्हा त्यांनी आपला पेहराव बाजूला ठेवत गळ्यात ‘गमछा’ घेतला आणि भारतीय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं जीवन अनुभवलं. यावेळी त्यांनी जनावरांना चारा भरवला आणि गोठ्यातील शेण देखील उचललं.

या व्हिडीओमध्ये मारियस हे सुरुवातीला आपला ब्लेझर काढून ठेवताना दिसत आहेत आणि शेतकरी शर्मा यांच्या सूचनेनुसार गळ्याभोवती गमछा गुंडाळून काम करताना दिसत आहेत. यावेळी मारियस यांनी चारा कापण्याचं यंत्रही चालवलं आणि स्वतःच्या हातांनी गाईंना चारा भरवला. तसेच त्यांनी आपल्या हातांनी गोठ्यातील शेण देखील उचललं.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये काय म्हटलंय?

दरम्यान, इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, “मारियस ओसवाल्ड यांनी जितक्या मेहनतीचं काम केलं, तितकं कदाचित इतर कोणत्याही राजनैतिक अधिकाऱ्याने केलं नसेल. किंवा कदाचित फार कमी राजनैतिक अधिकाऱ्यांनी आपल्या कामाच्या निमित्ताने एवढं प्रत्यक्ष शेतात उतरून काम केलं असेल. जर आपल्याला यशस्वी व्हावं असं वाटत असेल, तर आपल्याला हेही सिद्ध करावं लागेल की आम्ही स्वतः आधी यशस्वी होऊ शकतो”, असं म्हटलं आहे.